राधाच्या बाळाला मिल्क बँकेमुळे मिळालं आईचं दूध
अमरावतीतल्या राधाची प्रकृती गंभीर होती. तशी तिची प्रसूती अवघडच  होती.  त्याची कल्पना डॉक्टरांनी सुरुवातीपासूनच दिली होती.  त्यांच्या मार्गदर्शनामुळे, नवऱ्यासह घरातल्या सर्वांनीच  पहिल्यापासून घेतलेल्या काळजीमुळे बाळाचा सुखरूप जन्म झाला. राधा स्वतः सजग. आईच्या दुधाचं महत्त्व जाणणारी.  त्यामुळे याविषयीही डॉक्टरांसोबत आधीच चर्चा झाली होती.  राधा स्वतः बाळाला स्तनपान देऊ शकली नाही, तरीही राधाच्या बाळाला आईचं दूध मिळालं. राधाच्या बाळासारख्या  7500 पेक्षा अधिक बालकांना आईचं दूध मिळू शकलं, अमरावतीतल्या मिल्क बँकेमुळे.
रोटरी क्‍लब ऑफ मिडटाउनने  २०१६ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात  मदर मिल्क बँक सुरू  केली.  या बँकेत साडे आठ हजार मातांनी दूध दान  केलं आहे. 
आईच्या दुधाचं  महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्मतःच रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणाऱ्या आईच्या दुधाला अजूनतरी पर्याय मिळालेला नाही. मात्र, काही बालकांना ते  न मिळाल्यानं मृत्यूलाही कवटाळावं  लागतं. समाजातील ही उणीव भरून काढण्यासाठी स्थापन झालेल्या मदर मिल्क बँकेनं  हजारो बालकांना जीवदान देण्यासोबतच भविष्याची पहाटही दाखवली आहे.
 प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू झाला किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मातेला बालकास दूध देणे अशक्‍य झाल्यास अशा कठीण समयी ही बँक बालकाच्या मदतीला येते.
”मध्य भारतातील ही पहिली मिल्क बँक असून त्यानंतर वर्धा, जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर इथं  अशा बँका सुरू  करण्यात आल्या”, डॉ. राजेश बूब यांनी दिली. रोटरीच्या या प्रकल्पातील डॉ. राजेश यांनी बँकेचं महत्त्व सांगितलं.
 ”साधारणतः जन्माच्या वेळी बालकाचं  वजन दोन ते अडीच किलोच्या जवळपास असल्यास ते बाळ सुदृढ समजलं जातं. परंतु, बरेचदा जन्मतः बाळाचं  वजन अतिशय कमी असणं, नियोजित वेळेपूर्वीच बाळाचा जन्म, यामुळे बालक आरोग्याच्या दृष्टीनं कमजोर राहतं, त्याच्या जीवितास धोका असतो. अशावेळी त्याला या दुधाची आवश्‍यकता असते. ती गरज या बँकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.”
मिल्क बॅंकेसमोरची  काही आव्हानंही डॉ. राजेश यांनी सांगितली.  ”समाजात रक्ताचं आणि दुधाचं नातं याला महत्त्वाचं स्थान आहे.   अनेक नवोदित माताही  जुन्या रूढीपरंपरांच्या असल्याचं आमच्या लक्षात आलं. मग त्यांचं समुपदेशन सुरू केलं.
 मदर मिल्क बँकेत कार्यरत डॉक्‍टर आणि  परिचारिका प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना दूधदानाविषयी माहिती देतात.   त्यांना दूध दान करण्यासाठी प्रेरित करतात.”
दूध दानासाठी तयारी असलेल्या मातांचं दूध  सकिंग मशीनने  संकलित करून ते एका निश्‍चित तापमानावर ठेवलं  जातं. त्याची तपासणी केल्यानंतर ते बालकांना दिले जाते.  डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयानं यासाठी विशेष योगदान देत प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला आहे.
यासोबतच डॉ. मुरके हॉस्पिटल इथंही  मिल्क बँक स्थापन झाली आहे. याच प्रकारे अनेक खाजगी स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांची समुपदेशन करून त्यांना यासाठी  प्रेरित केलं जात  आहे. हे काम अजून सक्षमपणे व्हावं,  याचा लाभ  बाळांना व्हावा यासाठी आता प्रत्येक रुग्णालयात शास्त्रशुद्ध पद्धतीनं  आईचे दूध घेण्यासाठी  मशीन  देण्यात आलं  आहे.  जात, धर्मपंथ न बघता मातांना दूध दान करण्यासाठी प्रेरित केलं जात आहे.

-जयंत सोनोने, अमरावती

Leave a Reply