बुलढाणा जिल्हयात 29 मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटीव्ह पेशंट आढळला. आणि
जिल्हयातील नागरिकांना धडकीच भरली. एप्रिल महिन्यात जिल्हयात तब्बल 24 पॉझिटीव्ह पेशंट सापडले. लगेचच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोविड योद्धा म्हणून काम करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं. नुकतंच माझं बीडीएस झालं होतं आणि लॉकडाउनमुळे मी घरी परतले होते. हे आवाहन ऐकलं. उद्या मीही नावापुढे डॉक्टर ही पदवी लावणार आहे आणि अशा परिस्थितीत डॉक्टरांनी घरात बसायचं? हे मला पटत नव्हतं. म्हणून मी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटले. कोविड केंद्रात काम करण्यासाठी मी तयार असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनीही संशयितांचे स्वॅब घेण्याची जबाबदारी दिली.
माझ्या कामाचा पहिला दिवस. मनात खूप भीती वाटत होती. आरोग्य विभागाकडून गॉगल, डबल मास्क, शुज कव्हर, फेस शील्ड आणि वॉटरप्रूफ ड्रेस मिळाला. हा ड्रेस घातला. खूपच अनकन्फर्टेबल वाटत होतं. तरीही घाबरत घाबरत पाच संशयितांचे स्वॅब घेतले.

बुलढाणा जिल्हयात प्रारंभी एका विशिष्ट समाजाच्या परिसरात पेशंट आढळले होते. या परिसरात अनेक अफवा पसरल्या होत्या. याच दरम्यान जिल्ह्यात एक आंदोलनही भडकलं होतं. यामध्ये सरकार या समाजाला मुद्दाम टार्गेट करत असल्याचे आरोपही या भागातील काही पुढाऱ्यांनी केले होते. कदाचित त्यामुळेच पालिकेचे कर्मचारी या परिसरात आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना माहिती न देता कोरोनाच्या आडून दुसरी माहिती आपल्याकडून वदवून घेतली जात असल्याच्या भीतीपोटी या नागरिकांनी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावलं होतं. एकूणच या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये आणि समाजात नाराजीचं वातावरण होतं. तेव्हाचा हा माझा अनुभव. या परिसरातून काही संशयित पेशंट्सना कोविड केंद्रात आणण्यात आलं होतं. त्यातील चार बायका आणि एक दहावीत शिकणारी मुलगी यांनी माझ्यावर शिव्यांचा भडिमार केला. आजपर्यंत घरातही मला कुणी रागावलं नव्हतं. आणि इथं एकाचवेळी चार चार बायका माझ्याशी भांडायला लागल्या. ते पाहूनच मला रडायला आलं. त्यांचा आरोप होता की आम्ही त्यांचं नाव मुद्दाम पेशंटच्या यादीत टाकलं, त्यांच्या घरात कोणी पेशंट नसतांना देखील त्यांना उचलून आणलं, त्यांचा स्वॅब घेताना त्या बाया अगदी मारायला आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांना ज्या कक्षात ठेवलं त्या ठिकाणी जाऊन त्यांची चाचणी करण्याचीही भीती वाटत होती. हे सगळं खूपच त्रासदायक वाटत होतं. आपण आपला जीव तळहातावर ठेवून यांच्यासाठी काम करतोय आणि हे काय भलतंच असं मला वाटायला लागलं होतं.
आजी, आजोबा, आई वडिलांसहित डॉ. अभय बंग, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, प्रकाशभाई, डॉ. सुगन बारंठ, डॉ. अविनाश सावजी आदींच्या प्रेरणेने मला या परिस्थितीतही बळ मिळालं. मी या संशयित पेशंट्सचं कौन्सिलिंग करायचं ठरवलं. त्यांचा राग शांत व्हायची वाट बघितली. आणि या आजाराविषयी त्यांना समजावून सांगितलं. सगळं ऐकल्यावर मंडळी शांत झाली. त्यानंतरही अनेक वेळा अशीच परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा मात्र मी तयार होते. हा अनुभव आनंद देणारा नव्हता. पण, या लोकांना मी समजावून सांगू शकले, माझं कर्तव्य मी नीट पार पाडलं मला याचं समाधान वाटतं. मी कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकते असा आत्मविश्वास यातून आला.
– डॉ. गार्गी सपकाळ, बुलढाणा
शब्दांकन – दिनेश मुडे