पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या वाकड परिसरातली वेदांत सोसायटी. सध्याची कोविड19 ची दुसरी लाट आपण सगळेच अनुभवतो आहोत. त्याला सामोरं जाण्याचा सगळेच आपापल्या परीने प्रयत्नही करत आहेत. या वेदांत सोसायटीने काय केलं ते पाहूया. मोठ्या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातही, सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी वाकडच्या या सोसायटीने रिकामा फ्लॅट ताब्यात घेऊन तिथं रुग्णांच्या आयसोलेशनची सुविधा सुरु केली. पाठोपाठ वाढती गरज विचारात घेऊन क्लब हाऊसचं रुपांतरही आयसोलेशन सेंटरमध्ये केलं.
सोसायटीचे अध्यक्ष सोमनाथ धोंडे या उपक्रमाविषयी सांगतात, “पहिल्या लाटेमध्ये एका संपूर्ण कुटूंबाला करोना संसर्ग झाला. तेव्हाच आम्ही काही तरी प्रयत्न करायला हवेत हे जाणवलं. तातडीने सोसायटीत रिकामाच असलेला ‘थ्री बीएचके’ फ्लॅट आयसोलेशनसाठी मिळावा म्हणून एका सदस्याला विनंती केली. फ्लॅटचं भाडं भरण्याची तयारीही दर्शवली. इतर सदस्यांना आवाहन करुन बेड, बेडशीट, गाद्या, उशा अशा गोष्टी जमवल्या. पीपीई किट, N95 मास्क, पल्स ॲाक्सिमीटर, थर्मल स्कॅनर अशा गोष्टी सोडल्यास आम्हाला काहीही विकत आणावं लागलं नाही. नाश्ता करुन खाता येईल अशी सोय करुन दिली. दुपारी आणि रात्री जेवणाचा डबा रोज एका सदस्याकडून अशी व्यवस्था लावली. हीच तयारी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्येही केली. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून बिल्डर ॲाक्सिजन सिलिंडर्सची मदत करायला पुढे आले. सोसायटीचे सदस्य असलेल्या डॅाक्टरांनी या आयसोलेशन वॅार्डमध्ये राहणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी घेतली. त्यामुळे सौम्य लक्षणं असलेले सगळे जण इथंच राहून बरे झाले. पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये करोना पेशंटसाठी बेड मिळवणं महाभयंकर आहे हे आपण बातम्यांमध्ये पहातो-वाचतो. आमच्या सोसायटीतील कुणालाही शक्यतो त्या संकटाची झळ नको यासाठी आम्ही पुढे झालो आणि आमचे प्रयत्न यशस्वीही झाले! कुण्या एका माणसाच्या प्रयत्नातून असं काहीही उभं राहु शकत नाही, मात्र अनेक हात लागले आणि त्यामुळे बाहेर आ वासून उभ्या असलेल्या प्रश्नावर आम्ही आमच्यापुरतं उत्तर शोधू शकलो!”
वाकडच्या वेदांत सोसायटी सारख्या अनेक मोठ्या सोसायट्या पुण्या-मुंबईसारख्या शहरात आहेत. या सोसायट्यांकडे सुसज्ज क्लबहाऊसही आहेत. थोडी मेहनत आणि स्वयंसेवी वृत्तीने पुढाकार घेतला तर सौम्य लक्षणं असलेले अनेक जण असेच, घरच्या घरी, किंवा घराजवळ राहून बरे होऊ शकतील. त्यानिमित्ताने हॅास्पिटल आणि यंत्रणांवरचा ताणही थोडा कमी होईल. गरज आहे ती फक्त थोड्या कल्पकतेची आणि प्रयत्नांची!
– के.भक्ती