नाशिकमधलं परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर. चार मार्चचा दिवस. अतिशय छान,उत्साहात तितक्याच संयतपणे रॅम्प वॉक सुरू होता. स्टेजवर देहविक्री करणाऱ्या १२ स्त्रिया आणि ८ तृतीयपंथी. त्यांच्या साथीला शहरातले काही प्रतिष्ठित नागरिक.
“आयुष्याच्या एका वळणावर नकळत देहविक्रीच्या दलदलीत सापडल्यावर तिची ओळख समाजाच्या लेखी वारांगना अशीच राहते. स्त्री म्हणून, माणूस म्हणून त्यांचाही आत्मसन्मान जपला गेला पाहिजे.” या विचारातूनच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आसावरी देशपांडे यांनी रॅम्प वॉकचं आयोजन केलं. प्रवरा मेडिकल ट्रस्ट जवळपास १५ वर्ष नाशिकमध्ये देहविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करत आहे. ”या महिलांना कायमच नकारात्मक वागणूक मिळते. जगणं सुंदर असल्याचा विश्वास या महिलांमध्ये जागवता यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल,” असा विश्वास आसावरीताईंनी व्यक्त केला.
या महिलांना रॅम्पवर चालण्यासाठी प्रशिक्षण दिलं धन्वंतरी इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन अर्थात डीआयडीटी संस्थेनं. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देणं टाळणाऱ्या महिलांसाठी काम करणं आव्हानात्मक होतं, असं अनिल आणि मनीषा बागुल सांगतात. प्रशिक्षणात नुकतीच आई झालेल्या १९-२० वर्षाच्या मुलीपासून ५०-५५ वर्षाच्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. आपापल्या अडचणी सांभाळून २०-२२ स्त्रिया प्रशिक्षणासाठी यायच्या. ” यापुढेही संस्थेच्या उपक्रमांना सहकार्य राहील, असं बागुल सांगतात.
सहभागी स्त्रियांनी प्रथमच अशी संधी मिळाल्याचं सांगून आनंद व्यक्त केला. त्यांचं कौतुक करायला त्यांच्या वस्तीतल्या इतर महिलांही आल्या होत्या.
”आपल्या सुशिक्षित पांढरपेशा लोकांमध्ये या व्यक्तींबाबत टॅब्यू असतो. तो दूर करण्याची, त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याची आवश्यकता आहे,” असं बेटरफास्ट लाइफस्टाइलचे संदीप डांगे म्हणाले.
एफ.एस.डब्ल्यू.टी.आय., सेंटर फॉर सोशल मेडिसिन, दिशा महिला संस्था, मनमिलन सामाजिक संस्था आणि एनजीओ फोरम या संस्थाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. संस्था किंवा सरकार या महिलांच्या आरोग्य, पुनर्वसनासाठी काम करत आहे. मात्र त्यांच्या आत्मसन्मानासाठी समाजानं पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. हा संदेश रॅम्प वॉकमधून देण्यात आला.
– प्राची उन्मेष , नाशिक