रेशीमगाठ

 

राणी आणि नवल (नावे बदललेली ) यांच्या लग्नाला आता दोन महिने होतील. हे दोघे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे. दोघे एचआयव्हीबाधित. समर्पण फाऊंडेशनमुळे २१ फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं.

समर्पण फाऊंडेशन २०१६ पासून महिला, बालक, वृद्ध, अनाथ आणि दुर्धर आजारांबाबत जनजागृती आणि समुपदेशनाचं काम करत आहे. संस्थेचं एक महत्त्वाचं काम म्हणजे एचआयव्ही बाधितांचे विवाह. सुरुवातीला इतर संस्थांच्या माध्यमातून हे काम होत असे. पण यात काही तांत्रिक-अतांत्रिक कारणांमुळे विश्वासार्हता कमी पडत असल्याचं, आवश्यक गुप्ततेचा भंग होत असल्याचं अध्यक्ष सुनील गीते यांच्या लक्षात आलं. गीते यांचं यासंदर्भात दोडी ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक विलास बोडके यांच्याशी बोलणं झालं. तेव्हापासून विलास बोडकेसुद्धा या कार्यात सहभागी झाले.
राणी आणि नवल दोघे बोडके यांचे पेशंट. सोबत त्यांचे आईवडीलही. चारचौघांसारखं वैवाहिक आयुष्य असावं,असं दोघांना वाटे. पण एचआयव्हीबाधित असल्यानं लग्न कसं होणार, ही चिंता होतीच. मात्र त्यासाठी कुठल्या विवाहसंस्थेत जायची दोघांची तयारी नव्हती. बोडके यांच्यामुळे त्यांना समर्पणविषयी कळलं. तिथेच दोघांची ओळख झाली. दोघे एकमेकांसोबत लग्नासाठी राजी झाले. पत्रिकेऐवजी रक्तगट, सीडी4,व्हायरल लोड पाहून दोघांचं लग्न ठरलं. मानपान,हुंडा व इतर संबंधित प्रथांना पूर्णपणे फाटा. मंगळसूत्र आणि पाच भांडी देऊन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोना निर्बंधांचं पालन करत विवाहसोहळा झाला.
दोडी ग्रामीण रुग्णालयातल्या जानकी अहिरे- काळे यांचे प्रयत्नही यात मोलाचे होते.
”मनं जुळली की संसार सुखाचा होतो”,असं सुनील गीते सांगतात. संस्थेनं एक रुपयाही न घेता ही रेशीमगाठ जुळवून आणली.

-प्राची उन्मेष, ता. सिन्नर, जि. नाशिक

Leave a Reply