रोपं वाढली, उत्साह देऊन गेली

एरवी शाळा, क्लास आणि मैदानात रमणारी मुलं लॉकडाऊन काळात कार्टून चॅनल्स आणि ऑनलाईन क्लासमध्ये अडकली. पण यातूनही त्यांचा वेळ जाता जाईना. हा वेळ सार्थकी लावण्यासाठी आणि मुलांनी काही वेगळं करावं म्हणून बऱ्याच पालकांनी विविध प्रयोग केले. असाच एक वेगळा प्रयोग केला तो सोलापूर शहरातील मजरेवाडी भागात राहणाऱ्या प्रा.अश्विनकुमार भोपळे यांनी. त्यांनी 13, 9 वर्षांच्या आर्यन, अर्जुन आणि 7 वर्षांचा पुतण्या वीरेन यांना झाडं कशी लावायची हे शिकवलं. मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळापासून ८०० पेक्षा जास्त रोपं मुलांनी तयार केली. हे घडलं कसं?
प्रा. अश्विनकुमार भोपळे सांगतात, “बालवयातच मुलांवर पर्यावरणाचा संस्कार व्हावा आणि त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला. घराजवळ बरीच फळांची झाडं आहेत. मुलांनी विविध फळांच्या अन् सावली देणाऱ्या झाडांच्या बिया गोळा करून त्यापासून रोपं तयार केली. पावसाळ्याच्या दिवसात बिया छान रुजल्या. रोपं तयार झालेली बघून मुलांचा उत्साह वाढला आणि रोपांची संख्याही वाढू लागली. नंतर मुलांचे आजोबा आनंदराव आणि गोदावरी यांनी या रोपांना रोजच्या रोज पाणी देऊन मुलांच्या कामाला हातभार लावला. झाडांचा पालापाचोळा आणि किचनमधला ओला कचरा यापासून कंपोस्ट खत तयार करुन झाडांसाठी वापरलं.”

डोक्यावरील केसांमध्ये नायट्रोजनचा घटक असतो. झाडांच्या वाढीसाठी तो पोषक द्रव्य असल्याचे मुलांच्या लक्षात आल्याने रोपे तयार करताना केसांचा वापर केला. अंड्याची टरफलं कचराकुंडीत टाकण्याऐवजी ती खतं म्हणून वापरली. त्यामुळे काही काळात रोपवाटिका हिरवीगार झाली. आंबा, चिकू, रामफळ, सीताफळ, पपई, खजूर, जाई-जुई, मोगरा, कडुलिंब, लिंबू आणि शिकेकाई या वृक्षांची तयार केलेली रोपे त्यांच्या शेताच्या बांधावर लावण्यात येणार आहेत. तयार केलेली रोपं मोठी झाल्यावर मुलांमध्ये उत्साह वाढवतील. आणि ही ऊर्जा मुलांना भविष्यात पर्यावरणाच्या संदर्भात काम करण्यास बळ देईल, असं भोपळे यांनी सांगितलं.
भोपळे कुटुंबाचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे मुलांच्या वाढदिवसाला शाळेत चॉकलेट किंवा शैक्षणिक साहित्याऐवजी त्या-त्या ऋतूमधली फळं मुलांना वाटतात. चॉकलेट बनवणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या या विदेशी आहेत. त्यातून मिळणारा फायदा हा विदेशी कंपन्यांना होतो. चॉकलेटऐवजी फळे वाटल्यास त्याचा फायदा हा आपल्या भारतीय शेतकऱ्यांना होईल, भारतातला पैसा भारतातच राहील हा यातला हेतू.

– अमोल सीताफळे, सोलापूर

Leave a Reply