‘लंपन’ला लाभलेलं बालपण पुस्तकातच राहू नये …

‘शिवाजी म्हाराज जरी आपल्या वरगात असते तरी त्यास्नी या वर्गातसून अजाबात पळून जाता आलं नसतं. फाटकात मास्तरास्नी अलगद घावले असते,लई चिंगाट हाईत मास्तर.’ लेखक प्रकाश नारायण संत यांच्या पुस्तकांमधील बालनायक ‘लंपन’. (मौज प्रकाशन)
लंपनची प्रत्येक कथा बालकांचे सुंदर अनुभवविश्व साकारताना दिसते. एका कथेत लंपन म्हणतो, ‘मुलं शाळेत जाताना छोट्या छोट्या साखळ्या कुठंतरी निघाव्यात तशी काही पोरं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एका रांगेत निघाले, पोरी मात्र साखळ्या न करता फुलांच्या छोट्या छोट्या तु-याप्रमाणं. त्यांच्या आचरेकर बाई म्हणजे जराशा जाडजूड, चौकोनी वाटणार्याा चेहर्यांच्या, गाल वर आलेले आणि डोळे रागावल्यासारखे गरगरीत. लंपनचे आजी-आजोबा, आई-बाबा, मामा-मामी, मित्रमैत्रिणी, सुमन यांच्या भावविश्वासमवेत कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या एका सुंदर लहानशा गावाचे, तिथल्या निसर्गाचे, माणसांचे, प्राण्यांचे व्यापक दर्शन घडते. त्याच्या बालविश्वात प्राणी, पक्षी, पाणी, निसर्ग या सर्वांनाच महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या कल्पनेत मोठा पांढरा पक्षी जवळच झाडावर बसून जोरजोरात ‘चला पुढं चला’ असं म्हणत राहिला.


निरागस बालविश्व साकारणारी अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसून येतात.एक सुंदर आणि परिपूर्ण बालपण कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘लंपन’.
प्रत्येक बालकाच्या वाट्याला इतकं सुंदर बालपण का येऊ नये?
गेल्या दोन दशकात मुलांच्या हक्कांबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती झाली. कायदे, योजना, धोरणं, स्वयंसेवी संस्था, NGO च्या सुविधा यात जो बदल घडलाय हा बदल सकारात्मकच आहे. परंतु त्याचा वेग समाधानकारक नाही. तेव्हा आपण आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून समाजासाठी, बालहक्क मुलांना मिळवून देऊन अगदीच लंपनसारखे निखळ बालपण नाही तर त्यांच्या हक्काचे ‘बाळ’पण देण्यास मदत का करु नये?

– कविता जामदरे