पुणे जिल्ह्यातला आंबेगाव तालुका. या तालुक्यात 56 आदिवासी गावं आहेत. करोना संसर्ग हे काही फक्त शहरांवरचं संकट नाही. ग्रामीण भागातही करोना आहे. उलट ग्रामीण भागात शहरांसारख्या पायाभूत सुविधा नसल्यामुळे साथीचा उद्रेक रोखणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळेच कोविड साथ सुरू झाल्यावर इथंही कोविडविषयक जनजागृती सुरू झाली. पण कठिण होतं ते लोकांना कोविड लसीकरणाकडे वळवणं. कोविड लसीकरणाविषयी असलेले गैरसमज लक्षात आले ते आदिम संस्थेच्या कार्यकर्त्यांना.
एरवीचं आदिम संस्थेचं काम म्हणजे साक्षरता वर्ग चालवणे, आरोग्य विषयक काम करणे, आणि विविध कायद्यांविषयी जाणीव जागृती करणे. तालुक्यात नियमित काम करत असल्यामुळेच संस्थेला कोविड आणि लसीकरण या दोन्हीविषयी लोकांमध्ये जागृती करणं महत्त्वाचं वाटलं. आदिम संस्थेचे डॅा. अमोल वाघमारे म्हणाले, “परदेशातले लोक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि नियम पाळणारे असं आपण म्हणतो, तरी तिथंही सतत जनजागृतीची गरज भासते. मग आपण त्यात मागे पडून कसं चालेल, या विचाराने आम्ही या कामात सातत्य राखायचं ठरवलं. यामध्ये स्थानिक तहसीलदार कार्यालय, पोलीस यांचीही मदत झाली.”
“इथल्या गावांमध्ये लस घेण्याबाबत बऱ्याच शंका आहेत. त्या सोप्या भाषेत सोडवून लस का महत्त्वाची आहे हे त्यांना समजावलं. त्यासाठी करोना विरोधी जन आरोग्य अभियानानं तयार केलेली लसीकरणाचं महत्त्व सांगणारी पुस्तिका आम्ही वाटली. लस घेतल्याने ताप येतो, लस घेतली तर करोना होईल अशा शंकांची शास्त्रीय उत्तरं देत लसीकरणाच्या सकारात्मक बाजू ग्रामस्थांना समजावल्या. त्यांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत हे केलं. स्वत: मास्क आणि अंतराचे नियम पाळले आणि त्यांच्यावरही त्याची गरज बिंबवली. हे एकदा सांगून, करुन पुरेसं नाही, याची कल्पना असल्यामुळेच हे प्रयत्न सातत्याने आणि नियमित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, डॅा. अमोल सांगत होते.
शहीद राजगुरू ग्रंथालय आणि आदिम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येतं आंबेगाव तालुक्यातलं गाव न गाव पिंजून काढलं. लोकांचं शंकानिरसन करत तसंच दुखणं आलं तर ते अंगावर न काढता लगेच डॉक्टरांकडे जायचं अशा अनेक गोष्टींवर त्यांनी लोकांना सतत मार्गदर्शन केलं.
– के. भक्ती, पुणे