लाईन वूमन

दूरवर तयार होणारी वीज आपल्या घरापर्यंत येते. लाइनमनने जवळच्या एखाद्या खांबावरून वायर जोडून वीज आपल्या घरातील मीटरपर्यंत पोचवलेली असते. ट्रान्सफॉर्मर, फ्यूज यासारखी तांत्रिक नावे कधीतरी आपल्या कानावर पडलेली असतात. ‘डीपी जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित’ यासारख्या बातम्या पेपरात वाचलेल्या असतात. वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणशी, आपला याहून अधिक संबंध नसतो. एका युवतीने मात्र याच महावितरणकडे लोकांचं लक्ष वळवलं आहे. उषा भाऊसाहेब जगदाळे हे तिचं नाव. कडा गावात महावितरणमध्ये ती लाईनमन म्हणून काम करते. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातलं कडा हे १८ हजार लोकवस्तीचं गावं. गावात सहा महाविद्यालयं, पाच-सहा शाळा, दवाखाने आहेत. तिथं महिला नोकरी करतातही. पण महावितरणमध्ये लाईनमन म्हणून काम करणाऱ्या गावातील पहिल्या महिलेचा मान उषाकडे जातो. 
लाईनमनची कामं कोणती? विजेच्या खांबावर चढून वीज कनेक्शन जोडून देणे, डीपी दुरुस्त करणे, फ्यूज जोडून देणे. अर्थातच ही तांत्रिक कामे करणारे केवळ पुरुषच दिसतात. पण त्यांच्याच बरोबरीने ही कामे उषा सहजपणे करते आहे. 
आष्टी तालुक्यातलं देवीगव्हाण माहेर आणि तवलवाडी हे तिचं सासर. उषा मूळची खो खो खेळाडू. तब्बल अकरा वेळा ती राष्ट्रीय पातळीवर खो खो खेळली आहे. त्यामुळेच उषाची महावितरणमध्ये खेळाडूसाठीच्या राखीव जागेवर नोकरीसाठी निवड झाली. २०१३ मध्ये ती कनिष्ठ तंत्रज्ञ या जागेवर रुजू झाली. आष्टीच्या कार्यालयात तिला लिपिक वर्गाचे काम देण्यात आले होते. तिथे काम करतानाच तिने आयटीआयचा वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केला. मग वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कड्यात पदोन्नतीवर बदली झाली. आता कड्यात वीज बिल वसुलीसोबतच लाईनमनची सगळी कामं ती करते. एरवी इमारतीच्या गच्चीवरून खाली पाहिले तरी अनेकांना गरगरते. उषासाठी मात्र कोणत्याही आधाराशिवाय खांबावर चढून तारा जोडणे हा रोजच्या कामाचाच भाग. उषाची सफाईदारपणे चाललेली कामे अनेक महिला मुली मोठ्या कौतुकाने पाहत असतात. 
उषाच्या घरी शेती हाच व्यवसाय. त्यामुळे घरची आणि शेतातली कामे पूर्ण करून उषा नोकरीच्या फिल्डवर आपले कर्तव्य बजावत असते. अमुक कामे पुरुषांची तर तमुक महिलांची असा समज निदान महावितरणपुरता तरी उषाने आपल्या कामाने दूर केला आहे.
– राजेश राउत.