लॉकडाऊनमधली शाळा

कोरोना महासंकटाला लढा देण्यासाठी म्हणून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या मिळाल्या. त्याला आता अडीच महिने उलटून गेले. आता शाळा सुरू करायच्या हालचालीही थोड्याफार प्रमाणात सुरू झालेल्या दिसतात. परंतु या सर्व काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नाशिकमधील मनपा शाळा क्र.18, आनंदवली येथील इ. सातवीच्या वर्गशिक्षिका कुंदा बच्छाव यांनी एप्रिलच्या सुरुवातीलाच आपल्या विद्यार्थ्यांचा पालकांचा व्हाट्सएप ग्रुप तयार केला. त्यांच्या वर्गातील 40 पैकी 33 पालकांचा एनड्रॅईड मोबाइल असल्याने तेवढे विद्यार्थी त्यांना सुट्टीत सुद्धा त्यांच्याशी जोडलेले आहेत. आणि सुट्टी लागल्यापासून बच्छाव रोज राहिलेल्या अभ्यासावर ऑनलाइन व्हिडिओच्या रुपात पाठ्य घटक शिकवतात. त्यानंतर मुलांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल ही घेतात. शिकवलेल्या घटकावर मुलांना रोज online test पेपर घेतले जातात. अशा प्रकारे विद्यार्थी जरी घरी असले तरी शैक्षणिक प्रवाहापासून दूर गेले नाही याचा त्यांना आनंद होत आहे.


बच्छाव म्हणाल्या, “की या ऑनलाइन चाचण्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आणि शासनाने जरी परीक्षा रद्द केल्या असल्या तरी आम्ही आमच्या वर्गाचा अभ्यासक्रम रोज असाच व्हिडिओ पाठवून पूर्ण करून ऑनलाइन टेस्ट द्वारे परीक्षाही घेणार आहोत.” जे पालक व्हाट्सएप वर नाहीत त्या विद्यार्थ्यांना बच्छाव या स्वतः फोन करून रोजचा अभ्यास सांगतात.
कुठल्याही इंग्रजी माध्यम वा खाजगी शाळेत विद्यार्थांना घालण्याआधी अशा नगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचा विचार नक्कीच पालकांनी करावा अशाही त्या म्हणाल्या. कारण नगरपालिकेच्या शाळा कशातही कमी राहिल्या नाही. ऑनलाइन डिजिटल शिक्षण आणि तेही मोफत शिक्षण हे फक्त नाशिक नगरपालिकेच्या शाळेतच शक्य आहे.
– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply