प्लास्टिक सर्जरी सौंदर्यवाढीसाठी केली जाते असा समज असतो. पण, नुकतंच एका डॉक्टरशी बोलणं झालं आणि हा समज फोल असल्याचं कळलं. एक वेगळं जग उलगडलं. आजच्या जागतिक आणि राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिवसानिमित्त हा लेख खास नवी उमेदच्या वाचकांसाठी –
माझं फिल्ड प्लास्टिक सर्जरीचं. लॉकडाऊनमध्येही मी रोजचं कुठल्या ना कुठल्या सर्जरीसाठी जाते हे बघून ओळखीचे, शेजारीपाजारी मला विचारायचे की, लॉकडाऊनमध्ये कोणत्या सर्जरीज तू करतेस? तर प्लास्टिक सर्जरी ही अत्यावश्यक शस्त्रक्रियांमधलीच आहे आणि ती पुढं ढकलता येत नाही. तर ही पहिल्या लॉकडाऊनमधली ही गोष्ट. हॉस्पीटलमधून फोन आला. कुत्रा चावल्याची ती केस होती. एका माणसाच्या चेहऱ्याला त्याचा पाळीव कुत्रा चावला होता. खरंतर कुत्रा या प्राण्याला दिवसातून किमान दोनदा तरी फिरवून आणावं लागतं. पण लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या 2 आठवड्यात कडक लॉकडाऊनमुळे त्यांना फिरवून आणणंही लोकांना शक्य झालं नसावं. अशावेळी त्या प्राण्याला बाहेर न नेण्याचं कारण कळत नाही. पण यातून पाळीव प्राण्यांची मानसिकता समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. 2 ते 3 पेशंट असे होते की त्यांच्या घरचाच कुत्रा त्यांना चावला होता. एका महिलेच्या कानच कुत्र्याने फाडला होता. अशावेळी कानाचा तो तुकडा परत जोडण्याची शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. एका पेशंटच्या हाताला कुत्रा चावला होता. तो चावा अगदी आतपर्यंत होता. नुसती शस्त्रक्रिया नाहीतर नंतर रेबीजच्या इंजेक्शनचा कोर्सही त्या पेशंटला करावा लागला. त्यामुळे प्राण्यांची आवड असणाऱ्यांनी अशा अचानक येणाऱ्या अडचणींना लक्षात घ्यायला हवं आहे. असंच दुसरं होतं ते भटक्या कुत्र्यांचं. कारण ही कुत्रीही लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात उपाशी राहिली. उपासमारीने ही भटकी कुत्री हल्ला करू लागली. त्यातून अत्यावश्यक सेवेतल्या लोकांना ही कुत्री चावण्याचे प्रकार घडले. त्यामुळे पाळीव प्राण्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी हाही अभ्यास व्हायला हवा.
एरवी कुठलीही सर्जरी असते तेव्हा पेशंटच्या दोन ते तीन तपासण्या केल्या जातात. त्यात एडस्, हीपॅपायटीस बी, एचपीव्ही या तीन टेस्ट केल्याच जातात. आता यामध्ये कोविडची भर पडली आहे. आता कोविड टेस्टचा रिपोर्ट सहा ते सात तासात मिळतो. पण मार्च, एप्रिलमध्ये मात्र रिपोर्ट यायला 24 ते 48 तास लागायचे त्यावेळेस टेस्टसाठी स्वॅब घेतला जायचा पण रिपोर्ट यायची वाट बघणं शक्य नसायचं. त्यामुळे पीपीई घालून शस्त्रक्रिया केली जायची. पण तेव्हा 100 त एकाचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह यायचा. आता मात्र 10 तल्या 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असतात. हाताच्या किंवा पायाच्या शस्त्रक्रिया असतील तर फार प्रश्न नसतो पण अनास्थेशिया देणाऱ्या डॉक्टरला मात्र पीपीई किट घालावंच लागतं. पीपीई सगळीकडे उपलब्ध नव्हते तेव्हा तर शस्त्रक्रियेच्या वेळी पेशंटच्या नातेवाईकांना अगदी ससूनला जाऊन हे कीट आणावं लागत होतं. मार्च-एप्रिलमध्ये पीपीई कीट नाही म्हणून वाट बघत आम्ही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर वाट बघत अगदी अर्धा अर्धा तास थांबल्याचं मला आठवतं.
नंतरही अशा दोन ते तीन केसेस आल्या होत्या. लॉकडाऊन काळात एरवी जी प्लॅन ऑपरेशन होतात ती सगळी बंद होती. पण अचानक आलेल्या केसेस म्हणजे घरगुती अपघात. यातही पुरुषांचं प्रमाण जास्त होतं. एरवी घरात मदत न करणाऱ्या पुरुषांनी या काळात अचानक किचन हेल्प द्यायला सुरुवात केली. दोन जणांची मिक्सर फिरवताना त्याच्या पात्यात बोटं जाऊन ती कापली गेली. या दोघांच्या बोटांचे स्नायू, रक्तवाहिन्या जोडून बोट पूर्ववत करायला लागलं. हातावर, पायावर उकळतं तेल पडल्यामुळे भाजलं अशाही काही केसेस गेल्या. अजून एक विचित्र केस होती ती कुकरचं झाकण उडून थेट चेहऱ्यावर लागलं अशी. कुकरच्या वाफेनं चेहरा भाजलाच शिवाय जड झाकण आदळल्याने नाकाचं हाड मोडलं. असं पेशंट इमर्जन्सीमध्ये ऑपरेट करावे लागले. या केसमध्ये नाकातून भरपूर रक्तही येत होतं. त्यामुळे ते थांबवण्यासाठी आधी नेझल पॅकिंग करावं लागलं. अशावेळी पेशंटला शिंक येते. तरीही रक्त थांबवणं आवश्यक असतं. अशा स्थितीत कोविड टेस्टसाठी थांबता येत नाही. कारण पेशंटचा जीव महत्त्वाचा असतो.
कोविड काळातल्या आणखी महत्त्वाच्या केसेस होत्या लहान मुलांच्या. कारण मोठी माणसं जशी घरात होती तशीच मुलंही. आणि सगळ्यांची घरं काही मोठी नसतात. आयांना दिवसभर पुरणारं काम होतं. या सगळ्यात लहान मुलांच्या अंगावर आंघोळीसाठी काढलेलं अंगावर गरम पाणी सांडून त्यानं भाजलं, या भाजलेल्या त्वचेवर कोलायजन ड्रेसिंग करावं लागतं. हे ड्रेसिंग 24 तासाच्या आत करावं लागतं नाहीतर इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. यात भाजलेली त्वचा काढून टाकतात आणि कोलायजन ड्रेसिंग नावाचं बर्न्स ड्रेसिंग असतं ते त्वचेसारखंच असतं. ते लावल्याने जखम सात ते 10 दिवसांत भरून यायला मदत होते. उकळलेल्या पाण्याने भाजतं तेव्हा हे ड्रेसिंग करतात.
लॉकडाऊन उघडू लागलं तेव्हा सरकारने दारूची दुकानं उघडली. ही दुकानं सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यातच आम्हांला दिवसाला जवळपास 2 तर कधीकधी 3 केसेस कराव्या लागल्या. यात दारू पिऊन मारामारी केल्याच्या, अपघात आणि कधी कधी दारू पिऊन कामावर गेल्यावर त्या नशेत मशीनमध्ये हात अडकून अपघात झाल्याच्या केसेस होत्या. दारू पिऊन एकमेकांवर वार केल्याने हात कापले गेलेले, डोक्यावर वार केलेले अशाही केसेस हाताळाव्या लागल्या. काही केसेसमध्ये तर चेहऱ्याचे अवयवही यात कापले गेलेले अशा केसेसवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दारू उपलब्ध नव्हती तेव्हा घरगुती अपघात होते तर दारू उपलब्ध झाल्यावर अशा हल्ला आणि मारामारीच्या केसेसचं प्रमाण वाढलं. तेव्हा जवळपास सर्वच सर्जन्सला दिवसाला 2 शस्त्रस्क्रिया कराव्या लागल्या. कित्येकदा तर रक्तस्त्राव थांबत नाहीये म्हणून आम्हांला अर्ध्या तासाच्या आत हॉस्पीटलला पोचायला लागलं. तोपर्यंत कॅज्युअल्टीतले डॉक्टर रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यात त्या पेशंटला कोविड आहे, नाहीये असा विचारही करता येत नाही. त्यात रक्तस्त्राव थांबत नसेल तर पेशंटला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन भूल देऊन रक्तस्त्राव थांबवावा लागतो.
काही इलेक्टिव सर्जरी असतात त्या मात्र या काळात पुढं ढकलाव्या लागल्या. अर्थात त्यांनाही तसं म्हणावं का असा प्रश्न आहेच. कारण काही बाळं अशी आहेत की जन्मतःच त्यांचा ओठ दुभंगलेला आहे. बाळ पाच महिन्याचं असतानाच त्यावर पहिली शस्त्रक्रिया करावी लागते. कारण या नंतर टाळ्यावरही शस्त्रक्रिया करावी लागते. या दोन्ही शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नंतर बाळ बोलायला लागलं की या व्यंगामुळे ते बोबडं, तोतरं बोलू शकतं. अशा साथीच्या काळात लहान बाळाला घेऊन दवाखान्यात भरती होणं हेही आईवडिलांसाठी कठीण असतं. थोडक्यात प्लास्टिक सर्जरीमधल्याही आवश्यक शस्त्रक्रिया व्हायला हव्यात, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– डॉ. स्वप्ना आठवले
Related