लॉकडाऊनमध्ये गायींनाही मिळालं चारापाणी

 

लॉकडाऊन झालं आणि हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ लागले. काही सामाजिक संस्थांनी त्यांना अन्नधान्याचे किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मात्र रस्त्यावरील भटक्या मुक्या जनावरांची चारा पाण्याविना हाल अपेष्टा सुरू झाली. पोटाची भूक भागवण्यासाठी ते काहीही खाऊन दिवस काढू लागले.
काही गायी अशातच कॅरीबॅग खाताना तरुणांना दिसल्या. चारा पाण्याअभावी गायींची होणारी परवड पाहून सोलापुरातील काही तरुणांनी एकत्र आले. त्यांनी स्वखर्चाने त्या गायींना चारा पाण्याची व्यवस्था केली. शहरातील रुपाभवानी मंदिर, हनुमान नगर, सम्राट चौक, पांजरपोळ चौक, बाळीवेस, कौतंम चौक, कुंभारवेस या परिसरात जवळपास शंभरच्या आसपास गायी आहेत.

या गायींना रोज सकाळी हिरवा चारा दिला जातो. गायींना चारा देण्याचा हा उपक्रम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. सोलापुरातील अतुल सोनवणे, अभिजित कांबळे, अमोल सोनवणे, प्रमोद चंदनशिवे, आकाश कांबळे, अजित गादेकर, विश्वा वाघमारे या तरुणांच्या अनुकरणीय उपक्रमाचे कौतुक केलं जात आहे.

भुकेने व्याकूळ झालेल्या गाईची सेवा करण्यात एक वेगळा आनंद असल्याच्या भावना या तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याची माहिती बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर यांनी दिली.

– अमोल वाघमारे, सोलापूर

Leave a Reply