लॉकडाऊनमध्ये फुलवलं किचन गार्डन
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या हिवरखेड गावातली जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा. या गावातील शिक्षक, विद्यार्थी, पालक व गावकरी मिळून नवनविन संकल्पना विविध प्रसंगी शाळेत राबवित असतात. मग शालेय पोषण आहार कर्मचारी तरी कसे मागे राहणार! मागच्या वर्षी पहिल्या सत्रात बालकांमधील जीवनसत्त्वांची उणीव यावर शिक्षक आणि मुख्याध्यापकांची चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांना घरी जरी पालेभाज्या कमी खायला मिळत असतील तर आपण शाळेच्या परिसरातच पालेभाज्यांची लागवड केली तर हा विचार पुढे आला. आणि पालेभाज्या निर्मिती प्रकल्प सुरू झाला. या पालेभाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात मागील शैक्षणिक सत्रामध्ये सुरूही झाला. पहिल्या वर्षी पालक, कोथिंबीर व मेथीची लागवड केली. पण, जागा अरूंद त्यातून आजूबाजूला झाडे असल्याने पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता. वावरण्यासाठी जागाही अपुरी पडायची, पुरेसा सूर्यप्रकाश न पडल्याने त्यावर रोग पडला. त्यामुळे पहिल्या वर्षीचा प्रयत्न अशाप्रकारे अयशस्वी झाला.
शालेय पोषण आहार शिजविणारे मजूर गोपालभाऊ पाचनकर आणि त्यांची पत्नी सुनिताताई गोपाल यांनी मात्र यावर काय करता येईल याचा विचार सुरू केला. नंतर लॉकडाऊन सुरू झालं आणि हातावर हात ठेवून न बसता गोपाल आणि सुनीताताईंनी काम सुरू केलं. त्यांनी दोन ट्रॅक्टर गाळाची काळी माती शाळेच्या हजार स्वेअर फूट क्षेत्रातील रिकाम्या जागी आणून टाकली. आपल्या शेतातील शिल्लक व टाकाऊ ठिंबकचे पाईप आणले.
शालेय पोषण आहारात लागणाऱ्या पालक, मेथी, शेपू, वांगे, टमाटे, कोथिंबीर, मिरची, दोडके, मुळे, वाल या भाज्यांची लागवड केली. काही पालेभाज्या बीजरोपणातून तर काही बुलढाणा येथील रोपवाटीकेतून मुख्याध्यापक रामदास मिरगे यांनी विकत आणून दिल्या.
हे किचन गार्डन आता हळूहळू हिरवंगार दिसू लागलं आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होऊन मुलांना या भाज्या आहारात देता येतील म्हणून पोषण आहार कर्मचारी आणि शिक्षक सगळेच आनंदात आहेत.
अमोल सराफ, ता. खामगाव, जिल्हा बुलढाणा

Leave a Reply