उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं नागराळ. इथले गणेश महादेव गोरे. घरची १५ एकर शेती. वडील वर्षानुवर्षे पारंपारिक शेती करत. परंतु म्हणावं तसं उत्पन्न नव्हतं.
गणेशनी फॅशन डिसायनिंगचे शिक्षण घेतलं. पण म्हणावी तशी संधी मिळत नव्हती.मग गणेशनी घरच्या शेतीतच काही वेगळा प्रयोग करून उत्पन्न मिळवता येतं का हे बघायचं ठरवलं.
त्यांनी २०१९ मध्ये काकडी, भेंडी, गवार, वांगे लावलं. गेल्या वर्षी दोन एकरमध्ये कलिंगड लावलं. आंतरपीक म्हणून मिरची लावली. पण तेव्हा लॉकडाऊनमुळे सर्व कलिंगड वाया गेली. मोठं नुकसान झालं. तरीही न खचता नव्या उमेदीनं त्यांनी यंदा १० जानेवारीला एक एकरमध्ये खरबूज लावलं. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं. आंतरपीक म्हणून मिरची, वांगे लावलं. २० मार्चपासून खरबूज विक्री चालू झाली. कोरोनाची परिस्थिती पाहता बाजारपेठेत जाऊन विक्री करण्यापेक्षा शेताजवळ स्टॉल लावून विक्री करण्याचं गणेशनं ठरवलं. यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. मित्रांनी त्यांच्या ओळखीत माहिती दिली . किंमत वीस रुपये. सुरुवातीला जवळपास २०० किलो विक्री झाली. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होऊन ती दररोज तीन क्विंटलपर्यंत पोहोचली . गणेश यांना १५ टन खरबूज निघतील अशी आशा आहे. त्यातून तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. आंतरपीक म्हणून घेतलेल्या मिरची आणि वांगे याची विक्री स्थानिक बाजारपेठ आणि स्टॉलवर होत आहे. यातून किमान दोन लाख मिळण्याची आशा आहे.
खरबूज, मिरची वांगे यासाठी गणेश यांना खर्च आला ७० हजार. तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी त्यांना मार्गदर्शन केलं.
विकेल ते पिकेल आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांनी गणेश यांच्याकडून १६० किलो खरबूज खरेदी केली.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, बजरंग मंगरूळकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, ज्ञानेश्वर जाधव, सुनील जाधव, नामदेव गायकवाड, महारुद्र मोरे, बी.बी. जाधव, संजय गायकवाड, संतोष कोयले आणि तालुक्यातील कृषी सहाय्यक झटून काम करत आहेत.
यापुढे सेंद्रिय शेतीत अधिकाधिक प्रयोग करायचं गणेश यांनी ठरवलं आहे.
-गिरीश भगत,ता. लोहारा , जि. उस्मानाबाद