वडिलांच्या स्मृतिदिनी सॅनिटायझर्सचे वाटप
धुनकवाड (ता.धारूर, जि.बीड) येथील कुलकर्णी बंधू. वडील प्रभाकरराव कुलकर्णी यांचा बुधवारी (ता.१८ मार्च) म्हणजे आज स्मृतीदिन.
स्वतः कृतीतून सामाजिक कार्याची शिकवण देणाऱ्या वडिलांचा स्मृतिदिन विधायक उपक्रम राबवणे सर्वात योग्य आदरांजली ठरेल, या भावनेतून कुलकर्णी बंधूंनी गावात सॅनिटायझर्स वाटप करण्याचे ठरवले.
त्यानुसार प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी आज सकाळी बीड येथे सॅनिटायझर्सची खरेदी केली. वास्तविक, गावात प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे ते सॅनिटायझर्स देणार होते; परंतु तुटवड्यामुळे केवळ ७५ बॉटल्स मिळू शकल्या. सकाळी दहा वाजता कल्याण कुलकर्णी यांनी गावी जाऊन या बाटल्यांचे वितरण केले. यासह ग्रामस्थांना कोरोनाबाबत प्राथमिक माहिती देत आरोग्याची काळजी घेण्याचेही आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारा कार्यक्रम टाळत हा सामाजिक उपक्रम राबवत कुलकर्णी कुटुंबीयांनी आदर्श ठेवला आहे.
चला तर मग आपणही आपल्या परीने असे सामाजिक उपक्रम राबवू. गर्दीचे कार्यक्रम टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू.

Leave a Reply