वडील शिवराजला विचारत होते, ‘’या पैशांचे काय करायचे?’’ शिवराज इयत्ता सहावीत. बीड जिल्ह्यातल्या आष्टीच्या पिंपळेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलमधला. सातवीत गेलो की नवी सायकल घ्यायची हे त्याने वर्षभरापासून ठरवले होते. त्यासाठी तो पैसेही साठवत होता.
त्याचे वडील अमृत आजबे यांना कपाटात हा गल्ला दिसला. ते आष्टीमध्ये महावितरण कंपनीत नोकरीला. ”सायकल आणूया की सरकारला कोरोनाविरुद्ध लढायला देऊया?”
”सरकारला देऊया.” क्षणाचाही विलंब न लावता शिवराजने उत्तर दिले .
मग ते दोघे आष्टी तहसील कार्यालयात गेले . तिथे नायब तहसिलदार शारदा दळवी होत्या त्यांनी शिवराजचे कौतुक केले आणि हा गल्ला मुख्यमंत्री निधीसाठी जमा केला . गल्ल्यातील रक्कम मोजली असता ती साडे पाच हजार रुपये भरली.
सगळीकडेच शिवराजचे कौतुक केले. वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या.
आष्टीतलेच उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांनाही शिवराजचे कौतुक वाटले. त्यांनी अमृत आजबे यांच्याशी संपर्क साधला. शिवराजला सायकल भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.
चौधरी यांनी आष्टीच्या तहसीलदार निलिमा थेऊरकर यांच्या हस्ते त्याला सायकल भेट ही दिली.
”आपली सायकल असावी हे प्रत्येक लहान मुलाचे स्वप्न असते.” चौधरी सांगत होते. ”ते पैसे शिवराजने मुख्यमंत्री निधीला दिले ही माझ्यासाठी कौतुकाची बाब होती. आजबे कुटुंब भविष्यात त्याला सायकल घेऊन देऊ शकत होते. पण त्याच्या दातृत्वाचा सन्मान म्हणून मी त्याला सायकल भेट दिली.”
शिवराजसारख्या मुलांच्या कृतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही फेसबुक लाईव्हवर कौतुक केले आहे.
-राजेश राऊत, बीड