वरमालेआधी घातला मास्क

संगीतकार आनंद ओक आणि अभिनेत्री शुभांगी सदावर्ते दोघेही नाशिकचेच. आनंदने संगीत देवबाभळी या सुप्रसिद्ध नाटकाला संगीत दिलं आहे. तर, शुभांगीने याच नाटकात आवलीची भूमिका साकारून रसिकांची मनं जिंकली. दोघांनीही कोरोनाकाळात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या विवाहसोहळ्याला नातेवाईक आणि मित्रमंडळी अशी अवघी पन्नास जणांची उपस्थिती लाभली. कोरोनात लग्न म्हणजे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग हे सारे नियम त्यांनी पाळले. शिवाय पाहुण्यांची बैठक व्यवस्थाही अंतर राखूनच केली होती. पाहुण्यांना अक्षता आणि फुलांसोबतच मास्क आणि हँण्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या विवाहाचे अनोखेपण म्हणजे मंगलाष्टका झाल्यानंतर वधु-वरांनी चक्क एकमेकांच्या तोंडाला मास्क लावले. मग वरमाला घातल्या.

कोरोनाकाळातलं लग्न असल्यामुळे विवाहसोहळ्याला यायला नातेवाईकांना आधी भीती वाटत होती. कसं होणार लग्न? सामाजिक अंतर कसं राखलं जाईल? असे अनेक प्रश्न होते. मात्र कमी लोकांमध्येही हा विवाह सोहळा अगदी सुरळीत पार पडला. त्यामुळे नवरा-नवरीला लग्नविधींचाही एकाग्रतेने अनुभव घेता आला. एरवी लग्नाच्या वेळी सभागृहात होणारा गोंधळ, पाहुण्यांच्या मोठ्या आवाजातील गप्पा, लगबग असा काही प्रकार नव्हता.

शुभांगी सांगते, “खरं तर सध्या कोरोनात लग्न ही एक नवी संकल्पना या काळात अस्तित्वात आली. काहींना ती पटते, तर काहींना नाही. पण सध्याच्या धावपळीच्या युगात लग्नासारखा धार्मिक विधी खूप शांततेत आणि आवश्यक तितक्या कमी माणसांमध्ये लॉकडाऊन असूनसुद्धा पार पडतोय, हीच आमच्यासाठी खूप मोलाची बाब. यामुळे आमचं फोटोशूट, पाहुण्यांचं जेवण सारं काही शांततेत पार पडलं. आम्हाला हे सारं सगळयांसोबत एन्जॉय करता आलं, अनुभवता आलं.”

कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन लग्नविधी पार पाडण्यास हरकत नाही. कारण यामुळे कमी खर्चात लग्न होतेच. शिवाय अनावश्यक खर्चही टाळता येऊन आपण उर्वरित रक्कम समाजकार्यासाठी दानही करू शकतो, असा सल्लाही आनंद आणि शुभांगी लग्नोत्सुक असलेल्या मुला-मुलींना दिला आहे.

– व्ही. नमिता

Leave a Reply