भल्या पहाटे सर्व आवरून ती दुकानात हजर होते. सर्व जातीधर्माचे, वयोगटाचे पुरुष तिच्यासमोर बसतात. आत्मविश्वासाने ती त्यांच्या डोक्यावर वस्तरा चालवत त्यांचे मुंडण करते. अल्पावधीत न खरचटता तयार झालेला गुळगुळीत गोटा पाहून समोरची व्यक्ती आश्चर्यचकित होते. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात,धार्मिक क्षेत्र असलेल्या छोट्याच्या गावात ती शांततेने पण तितक्याच कणखरपणे तिचे काम करत आहे.
ही गोष्ट आहे कुंभमेळ्याचे ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्तावरील केशकर्तंनकार अर्थात मुंडण स्पेशालीस्ट वैशाली मोरेची. २०१७ पासून तिने हाती वस्तरा घेतला आहे.
खूप समजुतीने घेऊनही परिस्थितीत फरक न पडल्याने वैशाली लग्नानंतर काही वर्षातच मुलीला घेऊन माहेरी त्र्यंबकेश्वरला परतली. सुरुवातीची दोन वर्ष घरातच गेली. मग ”आता आयुष्याची लढाई एकटीने लढायची आहे तर किती दिवस घरात बसणार?”असे विचारत आईने तिला काम सुरू करायची प्रेरणा दिली.
सुरुवातीला ती पूजासाहित्य विकायची. पण त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. तिच्या भावाचे केशकर्तनालय. तिथे काम केले तर जास्त पैसे मिळतील, हे लक्षात आले. वैशालीने भावाकडे पाठपुरावा सुरू केला. भाऊ हसण्यावारी न्यायचा. एक दिवस मात्र तिने निक्षून विचारले, ”तू शिकवतोस की बाहेर कोणाकडून शिकू?” मग रात्री दुकान बंद झाल्यावर भावाने तिला त्याचे मुंडण करायला सांगितले. वैशाली खरे तर लहान असल्यापासूनच वस्तरा, कंगवा पाहत आलेली. पण वस्तरा चालवायची वेळ आली तेव्हा मात्र थरथर कापू लागली. पण थोड्याच वेळात तिने भावाचे व्यवस्थित मुंडण केले. त्याला कुठेही जखम झाली नाही. त्यातून मिळालेला आनंद आणि आत्मविश्वास आजही तिला प्रेरणा देतो. घरातल्या सर्वांनीच तिला प्रोत्साहन दिले.
साधारण महिनाभर भावाच्या डोक्यावर सराव केल्यावर एक दिवस सकाळी ती दुकानात हजर झाली. काशीचे एक आजोबा मुंडण करायला आले होते. भावाने त्यांना विचारले, ”ही माझी बहीण, तिने केले तर चालेल का ?” आजोबांनी हसतमुखाने सहमती दर्शवली. वैशालीने अत्यंत सफाईने त्यांचे मुंडण केले. त्यांनी तिचे कौतुक करून भरभरून आशीर्वाद दिले. सुरुवातीला लोक लांबून,गुपचूप काम बघायचे. तिच्याकडून मुंडण करून घेणारे मात्र तिला प्रोत्साहनच देत होते. एकदा जालना इथले एक शेतकरी आले होते. ते मुसमुसून रडू लागले. वैशालीला वाटले आपली काही चूक झाली का? तर ते म्हणाले,”मला मुलगी असती तर अशीच खंबीरपणे उभी राहिली असती. मला तुझा अभिमान वाटतो. ” मध्यंतरी कर्नाटकमधून काही वकील महिला त्र्यंबकेश्वरला आल्या होत्या. त्यांनी वैशालीचे कौतुक केले.
वैशालीची मुलगी आता वकील झाली आहे. वैशाली उत्तम जलतरणपटू असून दोन्ही कुंभमेळ्यात तिने जीवरक्षक म्हणून सेवा दिली होती. पोलीस मित्र म्हणून तिने काम केले आहे. महिला दक्षता समितीत ती सदस्य आहे. अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत.
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध अडचणींना खंबीरपणे तोंड देत वैशालीच्या जीवनाची गाडी आता सुरळीत मार्गक्रमण करते आहे.