वाचनगोडी लावणारे कडगे काका

वाचनसंस्कृती जपली पाहिजे..मराठी भाषा जगली पाहिजे.. वाचेल तो वाचेल.. वगैरे बोलणारे अनेक. पण पदरमोड करून, वाचकांना पुस्तकं विनामूल्य घरपोच पुरवत गेल्या २० वर्षापासून वाचनसंस्कृती जपणारा एखादाच. तोही सत्तरीचा ‘तरुण’. नांदेडचे बसवराज शंकरअप्पा कडगे. फुफ्फ्साची शस्त्रक्रिया, श्वास घेण्याचा त्रास, खांदेदुखी हे सारे विसरून आपल्या सायकलवर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन लोकांना वाचनगोडी लावणारे.  बसवराज उदगीरचे. शासनाच्या सिंचनविभागात ड्राफ्टमन म्हणून नोकरी मिळाल्याने नांदेडला स्थायिक झाले. नोकरीला १५ वर्षे शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी पत्नीसोबत गुंतवणूक सल्लागार व्यवसाय सुरू केला. सुखसंपन्न आयुष्य जगत असताना आपल्याकडील पैशाचा आणि वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरवून सायकलवर घरपोच पुस्तकसेवा देणे सुरू केले. आणि नांदेडमधल्या वाचकांचे कडगेकाका बनले.
“पालक-मुले टीव्हीचे वेडे झाले आहेत. ते काहीच वाचत नाहीत. त्यांना चांगली पुस्तके वाचायचा आग्रह धरून वाचनसंस्कार जपण्याचा आणि समाजऋण फेण्याचा प्रयत्न करावा असं ठरवून मी हे काम सुरु केलं,” ते सांगतात. 

१९९८ साली परळीला भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातल्या पुस्तक प्रदर्शनातून तीन हजार रुपयांची दोनशे पुस्तके विकत घेऊन ते नांदेडला परतले. “माझी हौसमोज करायला तुमच्याकडे पैसे नसताना ही पुस्तके घ्यायला कुठून पैसे आले?” पत्नीने जाब विचारला. त्याकडे दुर्लक्ष करत ते कामाला लागले.  लोकांना सांगू लागले, “तुमच्याकडे धन आहे. आरोग्यधनही आहे. पण चांगलं विचारधन साठवायला तुम्ही काय केलं आहे? तुम्ही काय वाचता? तेव्हा लोक म्हणायचे, “आम्ही काहीच वाचत नाही. त्याने काय फरक पडतो?” कडगे सांगत, “गांधीजींनी ‘अन टू दी लास्ट’ हे पुस्तक वाचलं आणि त्यांचं जीवन बदललं. विवेकानंदांचं चरित्र वाचून एक सैनिक समाजसेवक अण्णा हजारे झाला. विनोबा भावे, वि.दा.सावरकर अशा थोरामोठ्यांच्या जीवनावर झालेले वाचनसंस्कार माहीत नाहीत का? विचारधनाची शिदोरी नसेल तर तुम्ही खरे समाधान मिळवू शकणार नाही. मी तुम्हाला मोफत चांगली पुस्तके घरपोच देतो. ती वाचून मला परत करा.” सुमारे तीनशे कुटुंबाना ते चांगली पुस्तके पुरवत आहेत. याखेरीज त्यांच्या तीन हजार दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथालयाचा लाभ सुमारे दोन हजार लोक नियमितपणे घेत आहेत. सरकार सार्वजनिक ग्रंथालय काढायला अनुदान देते. पण कुठलीच सरकारी मदत न घेता कडगेकाका हे काम करत आहेत. कोणी आपल्याजवळचे चांगले ग्रंथ आणून दिले तर ते दान म्हणून स्वीकारतात. नांदेडमधल्या सर्वात जुन्या, स्वातंत्र्यसेनानींनी स्थापलेल्या विचार विकास वाचनालयाला अनेक दानशूर लोकांकडून त्यांनी ग्रंथ मिळवून दिले आहेत.
 “हे काम कष्टाचे आहे. पण वाचकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला समाधान मिळतं. तीच माझ्या जगण्याची उर्जा आहे”, कडगेकाका सांगतात.
कडगेंचा दिवस जिथे सुरू होतो त्या अंबिका योग कुटीर मधले साधक, नांदेडमधले विद्यार्थी, सामाजिक संस्था, उद्योगपती, बूटपॉलीश आणि चप्पलदुरुस्तीचं काम करणारा धीराजी देशमाने, कपडेधुलाईचं काम करणारा शेख गणी, एटीएमचे सुरक्षारक्षक असे अनेकजण कडगे काकांच्या पुस्तकसेवेचा लाभ घेत आहेत.

– सु. मा. कुळकर्णी.