परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातलं रामपुरी बुद्रुक. गोदावरीच्या काठचं सधन गाव. निसर्गसौंदर्य लाभलेलं. वड,उंबर,जांभूळ अशा झाडांमुळे पक्ष्यांचे थवे गावात दिसतात.
गावात मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित तरुण. तरुणांच्या असं लक्षात आलं की वृक्षारोपण कार्यक्रमात झाडं तर लावली जातात पण त्यांची जोपासना… तीन वर्षांपूर्वी गावातले सगळे युवक एकत्र आले. रामपुरी स्वच्छ, सुंदर हरितझाली पाहिजे,असं ठरलं. २०१७ मध्ये त्यांनी वृक्षवल्ली फाउंडेशनची स्थापना केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव आणि सेलूचे सहाय्यक निबंधक माधव यादव यांचं मार्गदर्शन. ‘चला जोपासूया महापुरुषांच्या आठवणी’ या संकल्पनेनुसार वृक्षलागवड सुरू झाली. आजपर्यंत ७,००० झाडं लावून त्यांची जोपासना सुरू आहे. गावातले सर्वच आपल्या प्रियजनांच्या,स्वतःच्या वाढदिवसानिमित्त, विवाहप्रसंगी,पुण्यतिथीनिमित्त,महापुरुषांच्या जयंतीनिमित्त झाड लावतात.
सध्या लॉकडाऊनमुळे सर्व जण गावी आहेत. यामध्ये गावातील शिक्षक,वकील,बँकेतील अधिकारी-कर्मचारी,विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले,तसेच इतर सरकारी,निमसरकारी कर्मचारी,खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी स्वयंस्फूर्तीनं रोज सकाळी 7 ते 1-1 या वेळेत नवीन झाडं लावणं,लावलेल्या झाडांना ठिबक करणं ,त्यांची मशागत करणं,गावाची स्वच्छता अशी अनेक कामं करत आहेत. सर्व झाडांना ठिबकसिंचनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना फळांचा आस्वाद घेता यावा म्हणून शाळेसमोर रस्त्याच्या दुतर्फा फळझाडं लावली आहेत. शैक्षणिक क्रांती अभियान रामपुरीचे अध्यक्ष अर्जुन नाईक सर यांच्या संकल्पनेतून शाळेच्या परिसरात 500 फळ आणि फुलझाडांचे उद्यान साकारलं आहे. दुर्मिळ होत असलेल्या फळांचं रानमेवा फळउद्यान तयार करण्यात येत आहे. यामध्ये 500 दुर्मिळ होत चाललेली फळझाडे लावण्यात येणार आहेत. अण्णासाहेब जगताप यांच्या एक मूल तीस झाड या संकल्पनेतून गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात, शेताच्या बांधावर ,परसबागेत फळझाडे लावतो.
झाडे लावून 100% जगवण्याचा रामपुरी गावचा नवीन पॅटर्न तयार झाला असून जिल्हा परिषद तो आता संपूर्ण जिल्ह्यात राबवत आहे.
या वर्षीच्या महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक वृक्षलागवड कार्यक्रम आणि हरितग्राम सामाजिक दायित्व अभियानाचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलताई विटेकर,उपाध्यक्ष अजय चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या उपस्थितीत झाला .
2020 या वर्षात सुमारे दहा हजार झाडं लावण्याचा संकल्प पासून आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आली आहे.
– बाळासाहेब काळे, ता. मानवत , जि. परभणी