वाढदिवसाची भेट

अथर्व सतीश मातने. उस्मानाबादमधल्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात पाचवीत आहे. आईबाबांनी वेळोवेळी दिलेले पैसे तो गल्ल्यात साठवायचा. जवळपास सहा- सात महिने तो पैसे साठवत होता.
१६ एप्रिलला त्याचा वाढदिवस. त्या दिवशी गल्ला फोडायचा आणि सायकल आणायची, हे अगोदरपासूनच ठरलं होतं. पण आता लॉकडाऊन असल्यामुळे गल्ला फोडून त्या पैशाचं करायचं काय असा प्रश्न होता.
अथर्व पेपर वाचतो, टीव्हीवरच्या बातम्या पाहतो. त्यामुळे आजूबाजूला काय चाललंय त्याची त्याला माहिती होती.. गल्ल्यातले पैसे कोणाला तरी मदत म्हणून देऊया, असं त्यांनी बाबांना सांगितलं.
”तुझ्या गल्ल्यात जेवढे पैसे जमतील तेवढेच मीही घालेन आणि मग एकूण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवू”, बाबा म्हणाले. त्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांनी मार्गदर्शन केलं. गल्ल्यातून १२५२ रुपये निघाले. बाबांनी त्यात १२४८ ची भर घातली. मग २,५५० रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आॕनलाईन पाठवला.
केक न कापता टरबूज कापत अथर्वनं वाढदिवस साजरा केला.
त्याला असलेली समज, त्याची कृती याचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ क्लीपदेखील व्हायरल झाली. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली. मुख्यमंत्री भूम-परंडा-वाशीचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याशी बोलले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सावंत यांनी अथर्वला सरप्राईज भेट म्हणून सायकल दिली.
-अनिल आगलावे,उस्मानाबाद