विकासपीडिया : वंचित जनतेसाठी माहितीची खिडकी!

जनतेने सामुदायिकपणे, जनतेसाठी, जनतेला समजेल अशा सोप्या भाषेत केलेला, जगातील यच्चयावत विषयांची माहिती देणारा ऑनलाईन मोफत ज्ञानकोष ‘विकिपीडिया’ सर्वपरिचित आणि लोकप्रिय आहे. त्यापासून स्फूर्ती घेऊन भारत सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वी ‘विकासपीडिया’vikaspedia.in सुरू केला आहे. विकासपीडिया म्हणजे विकासकोषच! इथे सर्व प्रकारची विकासाची, नागरिकांसाठी उपयोगी माहिती सोप्या भाषेत समजेल, अशी दिलेली असते. विकासपीडिया संस्कृत, उर्दू, इंग्रजीसह तब्बल २३ भाषांत उपलब्ध आहे. हे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया डेव्हलपमेंट गेटवे’ या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग आहे. सामाजिक विकासासाठी माहिती तंत्रज्ञानामार्फत उत्पादन आणि सेवा पुरवणं, हे या पोर्टलचं कार्य. हे वेबपोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा (MEIT) उपक्रम आहे. तर हैद्राबाद येथील प्रगत संगणक विकास केंद्रातर्फे (CDAC) कार्यान्वित केले जाते.

नागरिकांना पाहिजे ती माहिती मिळवणे सोपे नसते. अनेकदा अडलेल्या-नडलेल्यांना माहिती खरेदी करावी लागते. ती अडचण विकासपीडियामुळे दूर होऊ शकते. या पोर्टलद्वारे देशाच्या सामाजिक विकासाच्या गरजांकडे लक्ष दिले जाते. हे बहुभाषिक पोर्टल म्हणजे वंचित जनतेपर्यंत माहिती पोचवणारी ‘एक खिडकी’ योजनाच जणू! ह्या पोर्टलवर ग्रामीण दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या शेती, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ऊर्जा आणि ई-शासन ह्या सहा विषयांसंबंधीची माहिती आणि सेवासुविधांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, शेती विभागाखाली ‘धोरणे व योजना’ या पोटविभागात शेतीविषयक भारत सरकारच्या योजना, कार्यक्रम, धोरणे याविषयी माहिती दिली आहे. जसे, बायोगॅस प्रकल्पातील बाबींविषयी माहिती. आरोग्य विभागात ‘योजना व कायदे’ असा उपविभाग आहे. आरोग्य खात्याच्या विविध योजना आणि कायदे यासंबधीची माहिती आहे. शिक्षण विभागात व्यवसाय मार्गदर्शन असा उपविभाग आहे, इथे औद्योगिक तंत्रज्ञान, शिक्षणसंस्था, उद्योगधंदे, नवे व पारंपारिक व्यवसाय ही माहिती आहे. ई-शासन या विभागात माहिती अधिकार कायद्याबद्दलच तपशील, आधार कार्ड व संबंधित माहिती आहे. मराठी विकासपीडियाने उठावदार कामगिरी केलेली दिसते. मराठी विकासपीडियाला दरमहा पन्नास हजार लोक भेट देतात आणि ७-८ लाख हिट्सची नोंद आहे. ही संख्या इतर सर्व भाषांना आणि अनेकदा इंग्रजी विकासपीडियालाही मागे टाकणारी आहे. याचे प्रमुख कारण आहे सरकार आणि सूत्रधार संस्था ‘वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट’ यांचा संयुक्त पुढाकार. मराठी विकासपीडियात लिखाणाचे काम करणाऱ्या ४४ संस्था आणि तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. विकासपीडिया मोबाईलवर बहुतांशी बघितला जाईल, याची समज संचालकांना आहे. त्यासाठी विकासपीडियाचे App विकसित करण्यात आले आहे. हे ‘Vikaspedia Browser’ या नावाने विनाअट सर्वांसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, विकासपीडियाची तंत्रज्ञान रचना विकिपीडियाच्या धर्तीवर करण्यात आली आहे; ज्यात सर्वसामान्य नागरिक लिखाणात सहभागी होऊ शकतात. विकासपीडियावर कोणीही नोंदणी करून सदस्य होऊ शकतो, चर्चेत भाग घेऊ शकतो, नव्याने चर्चा सुरू करू शकतो. लेखक म्हणून नोंदणी करणे, विकासपीडियाने परवानगी दिल्यास आपले लेखन तिथे देणे, इतकेच नव्हे तर सध्याच्या लेखांमध्ये बदल करणे, भर टाकणे – हे कोणीही करू शकतो.

विकासपीडिया राज्यस्तरीय कार्यशाळा २२ जुलैला यशदा, पुणे येथे झाली. विकासपीडिया वेबपोर्टलशी संबंधित विषयांतील सरकारी, बिगर-सरकारी भागीदारांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घासटन डॉ.विश्वनाथ (कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांनी केले. विकास देशमुख (कृषि आयुक्त), कुसुम बाळसराफ (व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास मंडळ), डॉ. प्रवीण रेवणकर (संचालक, यशदा), डॉ.कृष्णकांत पाटील (सचिव, शालांत व उच्च शालांत शिक्षण मंडळ), जगदीश बाबू (C-Dac,हैदराबाद) आणि क्रीस्पिनो लोबो (कार्यकारी विश्वस्त, वॉटरशेड ऑर्गनायझेशन, पुणे) हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय शेळके, अनिरुद्ध मिरीकर, नीलिमा जोरवर या विकासपीडियाच्या प्रमुख आयोजकांनी केले. आयोजकांनी यावेळी हे प्रकर्षाने मांडले की नवे विषय, नव्या कल्पना, नवे लेखक आणि लिखाण यांचे विकासपीडियात स्वागत होईल

-अनिल शाळीग्राम