सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातला कन्ना चौक. याच परिसरात राहणार्या सायली गुर्रम नावाच्या एका जिद्दी आणि उत्साही मुलीची ही कहाणी. मूत्रपिंडाच्या आजारामुळे तिच्या वडिलांचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं. पतीच्या निधनानंतर सायलीची आई शामला कुटुंबाचा भार स्वत: च्या खांद्यावर घेतला आणि विड्या वळून घर चालवू लागली.
मूत्रपिंडाच्या आजारामुळे दवाखान्यात प्रचंड खर्च झाला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावत गेली. घरात खाणारी तोंडं सहा. त्यामुळे तिच्या आजोबांना देखील वयाच्या सत्तरीत प्रायव्हेट फर्ममध्ये कामाला जावं लागलं. परिस्थिती नाजूक असूनही सायलीच्या आईने मुलीचं शिक्षण बंद केलं नाही. आर्थिक परिस्थितीचं भान ठेवत सायली जिद्दीनं अभ्यास करू लागली. सायलीचे आजी-आजोबा, आई, शिवानी आणि व्यंकटेश अशी दोन भावंडे भाड्याच्या खोलीत सहा जण कसेबसे दिवस काढत होते.
सायली दिवसभर अभ्यास आणि रात्री विड्या वळून ती आईला हातभार लावायची. आपली मुलं शिक्षण घेऊन मोठ्या पदांपर्यंत पोहोचावी हीच तिची जिद्द. सायली अभ्यासात हुशार असल्यानं दहावीत ९२ टक्के तर बारावीत ८५ टक्के गुणांनी पास झाली. कोणताही खाजगी क्लास न लावता रोज बारा तास अभ्यास करत तिने नीट परीक्षेत ३१५ गुण सीईटी परीक्षेत 95 टक्के मिळवले.
डेंटिस्ट व्हायचं ही सायलीची इच्छा. पण वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दमडी देखील नव्हती. आईने धाडस करून चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले. तरीही पैसे कमी पडत होते. आईने मंगळसूत्र सोनाराकडे विकून तिची फी भरली. पुढे पुण्यातल्या सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये तिचा प्रवेश झाला. सायलीच्या मित्र-मैत्रिणींनी मदतीसाठी आवाहन करणारी एक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली.
ती पोस्ट सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. नेटिझन्सचे फोन सायलीकडे मदतीसाठी खणखणू लागले. तिच्या परिस्थितीची चौकशी करून लोक तिला मदत करू लागले. सोलापूरसह राज्य आणि परदेशातील काही दानशूर लोक आणि संस्था कडून मदतीचा ओघ सुरू झाला. याचबरोबर सेवा सहयोग या संस्थेनं तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. “विद्यार्थी विकास योजने”तून आता सायलीचं संपूर्ण शिक्षण होणार आहे.
हल्ली सोशल मीडिया हा करमणुकीचा विषय मानला जात असला तरी हाच सोशल मिडीया सायलीला मदतीचा आधार बनला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींकडून झालेली लाखोची मदत पाहून सायली आणि तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आजार वडिलांचा जीव पैसा नसल्यामुळे वाचवता आला नसल्याने डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचा निर्धार सायलीनं केला आहे.
– अमोल सीताफळे, सोलापूर