विदर्भातील पहिली बायोलॅब : संशोधन, निर्मिती, विक्री सर्वच कारभार महिलांच्या हाती

गेल्या तीन महिन्यात, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन तब्बल २१ लोकांना जीव गमवावा लागला. ८०० शेतकरी, शेतमजूरांना अपंगत्व, अंधत्व आलं. रासायनिक खतं, कीटकनाशकांमुळे खर्च जास्त, उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चाचा आणि विषमुक्त असा जैविक शेतीचा पर्याय उभा राहत आहे. या शेतीला लागणारी खतं, कीटकनाशकं जैविक पध्दतीने निर्माण करण्यासाठी यवतमाळच्या संगीता सव्वालाखे यांनी विदर्भ बायोटेक लॅब उभी केली. विदर्भातील ही पहिलीच बायोलॅब असून या लॅबची उत्पादनक्षमता पाचशे टनांवर पोहचली आहे. कृषीविषयक औषधांचं संशोधन, निर्मिती, विक्री, व्यवस्थापन सर्वच कारभार महिलांच्या हाती आहे, हे या लॅबचं वैशिष्ट्य.

संगीता दीपक सव्वालाखे (काहारे) यांनी कृषी कीटकशास्त्रात पदव्युत्त्तर (एम.एसस्सी) शिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे, १९९२ मध्ये या विषयात शिक्षण घेणाऱ्या त्या एकमेव महिला विद्यार्थी होत्या. त्या म्हणाल्या, “बीएसस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर चंद्रपूर तालुक्यातल्या सिंदेवाही इथे सहा महिने शेतावर प्रात्यक्षिकाची संधी मिळाली. रासायनिक पध्दतीमुळे होणारं शेतीचं नुकसान प्रत्यक्ष अनुभवलं. आणि जैविक शेतीक्षेत्रातच काम करायचं, हे पक्कं झालं. १९९५ मध्ये घरातल्याच एका खोलीत लॅब सुरू केली. ट्रायकोकार्ड हा माझा पहिला प्रकल्प. २३ वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत असून २००९ पासून यवतमाळ येथील एमआयडीसी परिसरात ‘विदर्भ बायोटेक लॅब’ नावाचे स्वतंत्र युनीट सुरू केले.”

बीजप्रक्रियेपासून उत्पादन हाती येईपर्यंत सर्वच काम या लॅबमध्ये महिलांच्या हाती आहे, हे विशेष. महिलांमध्ये शेतीविषयक संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विदर्भ बायोटेक या युनिटमध्ये संगीता सव्वालाखे यांनी ३० ते ३५ महिलांना रोजगार दिला आहे. इथे एकूण ११ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होते. यात ट्रायकोडर्मा, वंडर, ॲक्टीव्ह, थंडर, क्रायसोपर्ला, ट्रायकोग्रामी, उत्क्रांती, मॅलाडा आदी खतांचा समावेश आहे. यातील ट्रायकोडर्मा ४० ते ५० टन आणि उर्वरीत उत्पादने प्रत्येकी २० ते २५ टन तयार केली जातात. शिवाय दरवर्षी ४ ते ५ हजार लिटर द्रवरूप औषधांचीसुद्धा निर्मिती होते. रासायनिक खतांच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात ही खतं आणि कीटकनाशकं शेतक-यांसाठी पावडरी आणि द्रवरुपात उपलब्ध आहेत. ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे जिब्रालिक ॲसीड, एनझाईम्स् वापरण्याची गरज नाही. खरीप हंगामात महिनाभर पाऊस नाही आला, तरी ते झाड जिवंत राहतं, असं निरीक्षण संगीता यांनी नोंदवलं. या जैविक उत्पादनांना राज्यातील ७ ते ८ हजार शेतकरी, टाटा ट्रस्ट, स्वामिनाथन फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, बजाज फाऊंडेशन तसंच निमशासकीय संस्थांकडून मागणी असल्याचं त्यांनी‍ सांगितलं.

कृषीक्षेत्रातल्या पदव्या, संशोधन याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा, म्हणून संगीता यांनी नोकरीऐवजी स्वतंत्रपणे काम करायचं ठरवलं. माहेर- सासर या दोन्ही घरून भरपूर पाठिंबा मिळाल्याचं त्या आवर्जून सांगतात. 
कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक काँग्रेस आणि लंडनच्या ओव्हरसीज डेव्हलपमेंटचं सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. याशिवाय युनेस्कोचा, शासनाचा महिला उद्योजकता पुरस्कार, पुणे मिटकॉनचा पुरस्कार, जिल्हा उद्योग केंद्राचा पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विदर्भ बायोटेक लॅबला सर्वोच्च असं ISO 9001-2015 चे मानांकन आहे. 
पिकांसाठी वापरण्यात येणारी रासायनिक औषधं माणसांसाठी फार घातक ठरत आहेत. निरोगी जगण्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक अन्न आणि त्यासाठी जैविक शेती हा पर्याय आहे. हा पर्याय लोकसहभाग आणि लोकचळवळीतूनच स्वीकारला जाईल, असं त्या सांगतात. 
घरच्या घरी खतं कशी तयार करावीत, कोणत्या हंगामात कोणती पिकं घ्यावीत, याबाबत त्या शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात. एकाच प्रकारच्या परंपरागत पिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा वर्षभर पैसे येत राहतील, या दृष्टीने विचार करून शेती करावी, याबाबत त्या आग्रही असतात. 
संपर्क : संगीता सव्वालाखे
विदर्भ बायोटेक लॅब 
फोन नंबर 9422869423