विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देत कसली शेती

जिल्हा लातूर. इथल्या उदगीर तालुक्यातील तादलापूर गावातले पंकज पाटील. पंकज सोलापूर विद्यापीठातून एम.एस्सी झाले. उदगीरमधल्या हावगीस्वामी महाविद्यालयात अध्यापनाचं कामही करू लागले. पंकज यांच्या घरची शेती. वडील चंद्रशेखर आजवर ज्वारी, गहू, सोयाबीन सारखी पारंपरिक पिकं घेत होते. या पिकांमध्ये फारसं उत्पादन नाही हे पंकज बघत होते. आपल्या शिक्षणाचा आता शेतीत उपयोग करायला हवा हे पंकज यांना जाणवलं. त्यातूनच त्यांनी शेतीत प्रयोग करून बघायचं ठरवलं. त्यासाठी आजूबाजूच्या प्रयोगशील शेतकऱ्यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून माहिती घेतली.
दरम्यान, कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे शाळा, महाविद्यालयं बंद झाली. पंकज यांचाही ऑनलाईन क्लास सुरू झाला. क्लाससाठी नेटवर्क व्यवस्थित मिळावं म्हणून शेतामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करू लागले. दिवसभर शेतात राहिल्याने त्यांना शेती पाहण्यासाठी वेळ मिळाला. क्लास संपला की ते शेतीत रमू लागले.


आता शेतीत प्रत्यक्ष काम करायची वेळ आली होती. मग पंकज यांनी 26 मे रोजी एक एकरात आल्याची लागवड केली. त्यांनी पाच हजार रुपये खर्च करून एकरी 11 क्विंटल आलं लावलं. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ड्रीपची सोय केली. यासाठी 55 हजार रुपये खर्च केला. खतं, बियाणं आणि शेतमजूर मिळून एक लाख 75 हजार रुपयांचा खर्च केला.
दहा महिन्यांनंतर एक एकरात आल्याचं 80 क्विंटल उत्पादन मिळालं. लातूर हा जिल्हा खरं म्हणजे सोयाबीन आणि ऊसासाठी प्रसिध्द. ऊस पट्ट्यात आल्याचं हे विक्रमी उत्पादन घेत पाटील यांनी एक यशस्वी शेती प्रयोग करून दाखविला. नांदेड आणि हुमनाबाद येथील बाजारपेठेत हे आलं विक्रीसाठी जाणार आहे.
प्रा. पंकज पाटील म्हणतात, “शेतीला आता एक फायदेशीर आणि भरवश्याचा जोडधंदा असणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. त्यातून या आपल्यासोबत इतरांना देखील रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. भारतीय नागरिकांची जीवनशैली बदलत असून, ‘रेडी टू इट’ आणि ‘रेडी टू कुक’ उत्पादनांना ग्राहकांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळायला हवं. भविष्यात मी पेरूपासून जॅम आणि सीताफळांच्या गरापासून विविध पदार्थ तयार करायचा प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे.” ‍

– अमोल सीताफळे

Leave a Reply