विधवांना सामावून घेणारी अशीही एक संक्रांत

 

संक्रांतीनंतर पुढे रथसप्तमीपर्यंत संक्रांतीचं हळदीकुंकू करणं, वाण देणं हा महिलांचा कार्यक्रम सुरू असतो. मात्र हा सण विधवांसाठी नाही हा समज आहे. हा समज पुसायला आता विविध ठिकणी सुरूवात होते आहे. तसाच प्रयत्न करणारे परभणीमधला शेक हॅंड फाऊंडेशन. काही दिवसांपूर्वी वैधव्य आलेल्या महिलांनी शेक हँड फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संक्रांतीचा सण मोठ्या थाटात साजरा केला.


अपघाताने ऐन तारूण्यातच वैधव्य आलेल्या महिलेला समाजात दुय्यम स्थान दिले जाते. शुभ कार्य असो की सण उत्सव यात महिलांचा विशेष मकर संक्रातीसारखा सण असो, यावेळी मिळणारी वागणूक ही अपमानाची असते. अनेक ठिकाणी हेटाळणीच्या नजरेतून पाहिले जाते तर काही ठिकाणी अपशकुनी समजले जाते. अशा बुरसटलेल्या विचारांना छेद देण्याचे मोठे धाडस या महिलांनी केलं आहे.
यावेळी अध्यक्ष म्हणून इंजि. नारायणराव चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी डॉ.केशव खटिंग उपस्थित होते. जवळपास नव्वद महिला या कार्यक्रमास हजर होत्या. सर्वांना तिळगूळ, वाण आणि भेट म्हणून बेडशीट देण्यात आले. यावेळी या सर्व ताईंशी प्रमुख पाहुणे डॉ.केशव खटिंग यांनी अतिशय भावनिक संवाद साधला. या कार्यक्रमासाठी शेक हँड फाउंडेशन महिला टीममधील जयश्री कदम, अर्चना पावडे, अर्चना गोरे, श्रुतिका धुमाळ, सविता भाले, सुलक्षणा देशमुख, सीमा चौधरी, लटपटे, वर्षा हालकंचे व ज्योती महाजन यांनी प्रयत्न केले. शिवाय छपरे यांनी सर्व शेक हँड परिवारासाठी वसमतहून प्रेमाची भेट आणून सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

या कार्यक्रमात सहभागी महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. जोडीदार सोडून गेल्याचं दुःख होतंच. पण, चेहऱ्यावर एक सन्मान मिळाल्याचा आनंद होता. अनेक महिला कित्येक वर्षानंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आमच्या वाट्याला आलेल्या या विधवापणामुळे आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात देखील सहभागी होण्याचा अधिकार दिला जात नाही. यामुळे आमची घुसमट होते. अशा उपक्रमामधून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाल्याचा प्रत्यय येतो असे महिलांनी व्यासपीठावर बोलून दाखवले

– बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply