विसाव्याची भेळपुरी

दरवर्षी अनेक मुलं-मुली ही भेळ खाऊनचं दहावी-बरावीचे पेपर देण्यासाठी जातात. सध्या परीक्षा सुरू आहेत. आजही भेळ खाण्यासाठी अनेक विद्यार्थी येत होते. त्यांची भेळेची ऑर्डर पुरी करून त्यांना बेस्ट लक देण्यात वेळ कसा गेला, ते कळलंच नाही. माझी भेळ खाल्ली की त्यांचा पेपर चांगला जातो, असं मुलं म्हणतात….” नांदेडच्या विसावा उद्यानातील भेळपुरी सेंटरचे उत्तमराव मोतीराम वाघ सांगत होते.  गेल्या ३६ वर्षापासून नांदेड शहरातील महानगर पालिकेच्या विसावा उद्यानात ते ‘विसावा भेलपुडी सेंटर’ चालवित आहेत. भेळ सगळीकडे मिळते. पण उत्तमरावांच्या भेळेची चव मात्र गेल्या तीन दशकांपासून नांदेडवासियांना भूरळ पाडते आहे. ही भेळ खाल्ल्यावर यश मिळतं, हे विद्यार्थ्यांचं म्हणणं किती खरं, किती खोटं हे माहित नाही. पण या भेळने उत्तमराव वाघ यांना मात्र १०० टक्के यश दिलं, हे निश्चित.
उत्तमराव अभिमानाने सांगतात, “एकदा 7-8 वर्षाच्या मुला-मुलीने माझी भेळ खाल्ली की त्यांचं महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण होईपर्यंत, ते भेळ खायला येत राहातात. माझ्या भेळेचे असंख्य फॅन आज सातासमुद्रापार गेले आहेत. परंतु ते जेव्हा नांदेडला येतात तेव्हा त्यांच्या मुला-बाळांसह माझी भेळ खाल्ल्याशिवाय वापस जात नाहीत.” 

नाशिक तालुक्यातील एका अदिवासी खेडयातून चाळीस वर्षापूर्वी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तमराव वाघ हा तरूण नांदेडात आला. अस्थिरतेमुळे वडलोपार्जित शेती, गाव, घर सोडावं लागलं. काही दिवस खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम केलं. एका सहकाऱ्याने त्यांना ते आज तयार करत असलेली भेळ शिकवली. तेव्हा पुसटशीही कल्पना नव्हती की, ही भेळ आपलं आयुष्यच बदलून टाकणार आहे.  वाघ सांगतात, “१९८० मध्ये नांदेडला विसावा उद्यानाची उभारणी करण्यात आली. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विसावा उद्यानात उभे राहात होते. आजची फास्ट फुड लाईफ स्टाईल आली नव्हती. नांदेडमध्ये भेळ बनवणारे फारसे लोकही नव्हते. त्यात पुन्हा व्यवसायिक भेळ बनवणारे तर फारचं कमी. याच संधीचा फायदा घेत विसावा उद्यानात भेळचा स्टॉल सुरू करण्याचं मी ठरवलं. मी बनवलेल्या भेळची चव नांदेडमधल्या लोकांना खूप आवडली. पाहाता पाहाता माझी भेळ लोकप्रिय झाली. सुरूवातीला ५० पैसे, १ रु, २-३-५-८-१० रूपये करत आज २० रू प्लेट दरात मी भेळ देतो. आता दिवसाला हजार- दीड हजार रुपयांची कमाई होते. कधी अगदी ४० -५० प्लेट भेळ विकली जाते. तर कधी कमी. गेल्या ३६ वर्षांत भेळेचा दर्जा मी कधीही खालावू दिला नाही. भेळेसाठी लागणारे शेव, कांदा, कोथींबीर, नांदेडी मुरमुरे, चिंच, गूळ वगैरे उत्कृष्ट दर्जाचेच वापरले. ग्राहकांमध्ये भेदभाव नाही. एकाच चवीची भेळ सगळ्यांना. माझ्या भेळेच्या प्रतिष्ठित चाहात्यांची यादी खूप मोठी आहे.
 मी अनेक लग्नाकार्यात भेळचे स्टॉल लावतो. ही चविष्ट भेळ बनवण्याची कला मी माझ्या मुलाला देखील शिकवली आहे.
काही वर्षापूवी नांदेडमधले एकजण दुबईला लेकीकडे निघाले होते. तुझ्यासाठी काय घेवून येवू? असं लेकीला विचारल्यावर विसावा उद्यानातील भेळ घेवून या, असं तिने सांगितलं. माझी भेळ आज विदेशात देखील गेली आहे. उत्तमराव वाघ, मो.8698691072

 – उन्मेष गौरकर.