वृक्ष संमेलन, वृक्ष सुंदरी.
”येऊन येऊन येणार कोण , झाडाशिवाय आहेच कोण “
” वडाच्या नावानं चांगभलं , पिंपळाच्या नावानं चांगभलं , आंब्याच्या नावानं चांगभलं “
” दारी लावा तुळस , ऑक्सिजनचा होईल कळस “
” एक दोन तीन चार , झाडांचा जयजयकार “
या घोषणांनी पालवणमधल्या सह्याद्री देवराईचा परिसर दुमदुमून गेला होता. बीड शहरापासून साधारण पाच किलोमीटरवर हा परिसर.
साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आपण ऐकलं आहे. सौंदर्य स्पर्धा आपल्याला माहित आहेत. पण वृक्ष संमेलन, वृक्ष सुंदरी… पालवणमधल्या सह्याद्री देवराईत १० दिवसांपूर्वी याचं आयोजन करण्यात आलं होतं. जगातलं अशा प्रकारचं बहुदा पहिलंच. अभिनेते, वृक्षसंवर्धक सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकारातून हे संमेलन आकाराला आलं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वडाचं झाड. संयोजक शिवराम घोडके. आमदार संदीप क्षीरसागर या संमेलनाला उपस्थित होते.
कृषिभूषण घोडके यांनी सातारा जिल्ह्यात देवडी इथं शिंदे यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेली देवराई पाहिली. दुष्काळी भागातल्या बीडमध्येही अशी देवराई विकसित करण्याची इच्छा घोडके यांनी व्यक्त केली. शिंदे यांनीही सहकार्यासाठी होकार दिला.
बीडचे तत्कालीन जिल्हा सामाजीक वनीकरण अधिकारी अमोल सातपुते यांनी त्यासाठी पालवणजवळची २०७ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली. बीडमधील पर्यावरण प्रेमीनी इथं वृक्षलागवड आणि परिसर विकास सुरू केला. सयाजी शिंदे , रोपवाटिका मालक रघुनाथ ढोले आणि बीडचा वन विभाग यांनी रोपं उपलब्ध करून दिली. २०१७ मध्ये सुरू झालेलं काम हळूहळू आकार घेऊ लागलं. त्यातूनच दरवर्षी १४ ऑगस्टला या देवराईचा वाढदिवस साजरा होऊ लागला . त्यास अनेक जण उपस्थित असत . यातूनच या परिसरात पहिलं वृक्ष संमेलन घेण्याची कल्पना पुढे आली. संमेलनाला महसूल आणि वनविभागानं साहाय्य दिलं. संमेलनाला विविध जिल्ह्यातले पर्यावरण अभ्यासक आले होते. विद्यार्थीही होतेच.
देवराई यशोगाथा, दुर्मीळ वनस्पती, पक्षी झाडे सहसंबंध, गवताळ परिसंस्था, फुलपाखरू, पाणी व्यवस्थापन अशा विविध विषयांवर दोन दिवस चर्चा, व्याख्यानं झाली. झाडांविषयीच्या अनुभवांची देवाणघेवाण झाली. वृक्षवनस्पतींचे, पर्यावरणावरील विविध विषयांचे स्टॉल्सही होते. युवतींसाठी वृक्षसुंदरीं स्पर्धा झाली. यात १०० युवतींनी भाग घेतला होता. यात युवतींना झाडांविषयीचे प्रश्न विचारण्यात आले. क्रांती बांगर या स्पर्धेची विजेती ठरली.
महाराष्ट्रातील परंपरागत देवरायाचे संवर्धन करावे , राज्यवृक्ष आंबा आणि राज्यफुल ताम्हण प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या आवारात लावावेत . प्रत्येक तालुक्यात जैवविविधता उद्यान विकसित करावे असे ठराव या संमेलनात झाले.
वडाच्या झाडाचं पूजन करून उदघाटन झालेल्या या संमेलनाचा समारोप जखमी गरुडावर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडून झाला.
-राजेश राऊत, बीड

Leave a Reply