व्हीआयपी रोडवर विद्रुप अवस्थेतला,स्वतःशी बडबडणारा तो आता दिसत नाही ….

सोलापूर शहरातला गांधी नगर ते सात रस्त्याचा व्हीआयपी रोड. या रस्त्यावर आता इरफान दिसत नाही.

तो कधी रस्त्याच्या कडेला बसलेला तर कधी उभा असायचा. नग्नावस्थेत. स्वतःशीच बडबडायचा.   ”अबे पाणी ला…थॅमस्प ला…बिस्टॉल दे… मटन बिर्याणी चाहिए…गरम चहा… मावा, बिसलेरी…” दरारायुक्त बोलणं,  मळलेली दणकट शरीरयष्टी, केसांच्या जटा,दाढीवर ओघळणारी माव्यासुपारीची लाळ, हातात काठी असा तो हक्कानं,रुबाबात मागून खायचा.

त्याला घाबरून दुकानदारही त्याला लागेल ते देऊन मोकळे होत. काहींच्या म्हणण्यानुसार त्यानं येरवडा मनोरुग्णालयात अनेक वर्ष काढली. घरच्यांच्या दुर्लक्षामुळे तो पुन्हा याच वाटेवर आला. महावीर चौकापासून ते फॉरेस्टच्या भाजी मंडईपर्यंत तो वावरायचा.  सकाळी  गुरूनानक चौकापासून हेरिटेज,दारासा हॉस्पिटल, लष्कर भागातून सात रस्त्याच्या दिशेने तो रेल्वे स्टेशनकडे जात असे पुन्हा दुपारच्या वेळी हाच पल्ला गाठायचा…! हा त्याचा अनेक वर्षांचा  दिनक्रम होता.
अतिश शिरसाट यांना इरफानविषयी  कळलं. अतिश २०१६ पासून संभव फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरमधल्या बेवारस मनोरुग्णांसाठी काम करत आहेत. त्यांनी इरफानशी नातं जोडलं,माणुसकीचं.  अनेक दिवस त्याच्यासोबत घालवून  त्याच्याबद्दल जाणून घेतलं. मग पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना इरफानविषयी सांगितलं. जळगावच्या मानवसेवा तीर्थमध्ये त्याच्यावरचे उपचार,पुनर्वसन करण्याविषयी सुचवलं.  बैजल साहेबांनीही तत्परता दाखवली. पोलीस ठाण्यानं सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. इरफानला जळगावला नेण्यासाठी गाडीची सोय केली आणि या महिन्यात इरफान मानव सेवा केंद्रात दाखल झाला.   १९८३ पासून समाजकार्यात असणाऱ्या अमर संस्थेकडून मनोरुग्णांसाठी चोपडा तालुक्यातल्या वेले गावात साधारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून मानव सेवा तीर्थ चालवलं जात आहे. इथं पोहोचल्यावर संस्थेच्या नरेंद्र पाटील यांनी मोलाचं सहकार्य केलं. त्याची दाढी,केस कापूनआंघोळ घातली. नवे कपडे दिले. त्यामुळे इरफान आता ओळखू येत नाही. त्याच्या जेवणाची सोय करून उपचार सुरू केले.

-जवेरिया रईस,  सोलापूर

Leave a Reply