शंका समाधान करणारी विज्ञान पेटी

‘झाडांची पाने हिरवीच का आहेत’, ‘लिंबाच्या झाडांची पाने कडू का लागतात इतर झाडांची का नाही लागत’, ‘पृथ्वी सारखीच दुसरी पृथ्वी आहे का, तिथं मानवी वस्ती आहे का आणि असेल तर मग आपला त्यांच्याशी संपर्क का नाही झाला’ असे आणि विज्ञान, खगोलशास्त्राशी संबंधित शेकडो प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात, मग विद्यार्थी आपले प्रश्न विज्ञान शंका पेटीत टाकतात. कधी शिक्षक त्यांना या प्रश्नांची उत्तरं देतात, कधी त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून उत्तरं मिळवली जातात तर कधी स्वत: विद्यार्थीच इतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधून देतात. बीड तालुक्यातील उमरद खालसा इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या आगळ्या उपक्रमाची ही गोष्ट. शाळेचे मुख्याध्यापक विकास परदेशी यांच्या पुढाकारातून विज्ञान शंका पेटी उपक्रम फेब्रुवारीत सुरू केला गेला. रोज किमान ४० प्रश्न या पेटीत विद्यार्थ्यांकडून येत आहेत. विकास परदेशी म्हणाले, “कोरोनामुळे शाळा अनेक महिने बंद होत्या, ऑनलाइन शिक्षण सुरू होते, कुठं गटशाळा सुरू होत्या. नंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. त्यावेळी विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड कमी झाली आहे असं आम्हाला वाटल, त्यांचं वाचनही कमी झालं होतं. त्यांच्यात चौकसपणाही कमी होता. त्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवायचं, मनाला, विचारांना चालना द्यायची तर काहीतरी करायला हवं होतं. त्यामुळे आम्ही विज्ञान शंका पेटी हा उपक्रम सुरू केला.”

शाळेत एक विज्ञान शंका पेटी बसवलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित आणि आपल्या क्रमिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त त्यांना पडणारे विज्ञान, खगोलशास्त्र विषयी प्रश्न टाकायचे. रोज ही पेटी उघडली जाते आणि त्यातील प्रश्नांची उत्तरे दिली जातात.
कधी दररोजच्या परिपाठात, कधी वर्गामध्ये त्या विषयाशी निगडीत पाठ शिकवताना ही उत्तरं दिली जातात. कधी शिक्षक ही उत्तरे देतात, कधी उत्तर देण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञाला निमंत्रीत केले जाते तर कधी विद्यार्थ्यांनाच प्रश्न देऊन त्यांना उत्तर शोधा असं सांगितलं जाते. मग विद्यार्थी हे उत्तर शोधण्यासाठी वाचन करतात किंवा त्या विषयाची माहिती असलेल्या व्यक्तींकडून उत्तर समजून घेतात, लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन शाळेने तंत्रस्नेही झालेली मुलं पालकांच्या मदतीने गुगलवरही या प्रश्नांची उत्तरं शोधतात, माहिती वाचतात.


विकास म्हणतात, “या छोट्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं वाचन वाढलं आहे. प्रश्न टाकण्याची आणि उत्तरं शोधण्याची जणू त्यांच्यात स्पर्धाच आहे. यामुळे त्यांना प्रश्न पडतात, उत्तरं शोधण्यासाठी अभ्यास होतो. अनेक प्रश्न आव्हानात्मक असतात अशा वेळी आम्हालाही विद्यार्थ्यांचं समाधान होईल असं उत्तर देताना अभ्यास करावा लागतो. ८० दिवसांचा हा उपक्रम एप्रिल अखेरपर्यंत चालेल कारण त्या नंतर शाळांना सुट्या लागतात. नव्या सत्रात नव्या उत्साहाने पुन्हा हा उपक्रमही सुरू ठेवायचं ठरलं आहे.”

– अमोल मुळे, बीड

Leave a Reply