हिंगोलीत सेवासदन वसतिगृह आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. गेल्या २ वर्षांपासून ४० मुलं इथं राहतात. मीरा कदम या स्वकमाई आणि लोकसहभागातून ते चालवत आहेत.
मीराताई लातूरच्या तांदुळजा गावच्या. १८ महिन्यांच्या असतानाच त्यांच्या दोन्ही पायांना पोलिओ झाला आणि अपंगत्व आलं. त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची. खडतर परिस्थितीतच मीराताईंनी जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं.
वर्ष २००२ पासून हिंगोलीत त्या जिल्हा परिषद शिक्षिका आहेत. सुरुवातीला प्राथमिक शाळा कोंडवाडा, त्यानंतर प्राथमिक शाळा सिंनगी नागा आणि गेल्या तीन वर्षापासून प्राथमिक शाळा अंतुलेनगर इथं त्या कार्यरत आहेत. पण स्वतःच्या अपंगत्वावर मात करत स्वतःच्या पायावर उभं राहण्यापुरतंच मीराताईंचं कार्य मर्यादित नाही.
स्वतः संघर्ष अनुभवलेल्या मीराताई इतरांच्या संघर्षात त्यांना हात देतात. पाचशेहून अधिक गावात जाऊन दुष्काळामुळे मनोधैर्य खचलेल्या शेतकऱ्यांचं समुपदेशन त्यांनी केलं आहे. कोरोनाच्या कठीण काळातही सेवासदनमधल्या मुलांच्या शिक्षणात त्यांनी खंड पडू दिलेला नाही. या मुलांना अभ्यासासोबतच संगणक, योग आणि खेळांचं प्रशिक्षण इथं मिळतं.
मीराताईंच्या या कामात त्यांचे पती धनराज कदम आणि कवी शिवाजी कऱ्हाळे यांची उत्तम साथ त्यांना लाभली आहे.
– बाळासाहेब काळे