शाळेतच तयार होतोय बायोगॅस!

अहमदनगर जिल्ह्यातील धांदरफळ खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेत मी शिकवितो. इतर जि प शाळांप्रमाणे आमच्या शाळेतही ‘शालेय पोषण आहार’ योजना राबवली जाते. आम्ही दररोज जवळजवळ ११० मुलांसाठी जेवण बनवतो. स्वयंपाकासाठी अर्थातच एलपीजी गॅस वापरला जायचा. अनेकदा वर्ग चालू असताना गॅस सिलेंडर संपायचा. अशावेळी नवीन सिलेंडर आणण्यासाठी आम्हा शिक्षकांना धावपळ ठरलेलीच. शेवटी चुलीवरही जेवण बनवून बघितले, पण त्यासाठी लागतात लाकडे. म्हणजे वृक्ष तोड आली. शिवाय धुरामुळे प्रदूषण तर व्हायचेच, शिवाय स्वयंपाक करणाऱ्या महिलांनाही खूप त्रास व्हायचा.


हे सगळं पाहूनच आम्ही शिक्षकांनी ठरवलं, की पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या टंचाईची समस्या आता सोडवायलाच हवी. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही शालेय व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेतली. त्यांच्यासमोर बायोगॅसचा प्रस्ताव मांडला. स्वयंपाकघरातले उरलेले अन्न, शाळेतले आणि ग्रामपंचायतीतले मलमूत्र आणि इतर कचरा एकत्र करून बायोगॅस बनवला तर दुर्गंधी आणि अस्वच्छता हे दोन्ही प्रश्न सुटणार होते. महत्वाचे म्हणजे जेवण बनवण्यासाठी हे इंधन म्हणून वापरता येणार होते. बायोगॅस प्रकल्पाची कल्पना सर्वांनी उचलून धरली. त्यासाठी शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी दहा हजार रुपये जमविले, तर ग्रामपंचायतीनेही दहा हजार रुपये दिले. 
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम बायोगॅसची टाकी आणि कचरापट्टी टाकण्यासाठी इनलेट हौद बांधला. मग जमिनीत छिद्र पाडून आउटलेट बसवला. ग्रामपंचायत आणि शाळेचं शौचालय यांच्यात जमा होणारं मलमूत्र एकत्रितपणे बायोगॅसला जोडण्यासाठी पाईप बसवून घेतले. बायोगॅस संयंत्र तयार झाले. आता ते कसे चालते ते बघण्याची उत्सुकता होती. गावात बहुतेक सर्वांची शेती. त्यामुळे जमा झालेले जनावरांचे शेण, पालापाचोळा आणि शाळेत शिल्लक राहिलेले अन्न इनलेटमधून आत टाकले. आणि आठवड्याभरात बायोगॅस संयंत्राला पाईप जोडून तो शाळेतील स्वयंपाकघराच्या चुलीला जोडला. आमची शेगडी मस्त चालू लागली.
२०१३ साली सुरु केलेला बायोगॅस उपक्रम आजही अतिशय उत्तमरित्या चालतो आहे. पूर्वी १८ ते २० दिवसातून सिलेंडर आणावा लागत असे. आता एलपीजीसोबत बायोगॅसही वापरात असल्यानं तीन महिने तरी नवा सिलेंडर आणावा लागत नाही. यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात नाही. शौचालयातील मलमूत्र बंद पाईपमधून थेट संयंत्रात जात असल्याने, दुर्गंधी नाही आणि गटारेही उघडी राहत नाहीत. यामुळे गावातील रोगराईचे प्रमाणही कमी झाले. सिलेंडरचे वाचलेले पैसे आता आम्ही मुलांना अधिक उत्तम पोषण आहार पुरविण्यासाठी खर्च करतो.
बायोगॅस प्रकल्पाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा-http://samata.shiksha/…/the-many-benefits-of-a-biogas-plant/ किंवा फोन करा- मच्छिंद्र पावसे- 7588606092

– स्नेहल बनसोडे शेलुडकर