शाश्वत शेतीची पर्यावरणप्रेमी वाट

वाशिमच्या कारंजा लाड तालुक्यातलं लाडेगाव. इथल्या मिश्रा यांच्या शेतात ग्रिन्झाच्या शाश्वत शेतकरी गटाची बैठकही होती. या बैठकीत आजूबाजूचे शेतकरी आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. निलेश हेडा यांच्या गप्पा सुरू होत्या.
हा 25 शेतकऱ्यांचा गट गेली सुमारे 10 वर्षे शाश्वत शेती करत, चांगली पिकं काढतोय. पण शाश्वत शेती म्हणजे काय? तर डॉ. हेडा सांगतात, “बघायला गेलं तर शाश्वत शेतीची व्याख्या फार सोपी. पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून त्याचं कसलंही नुकसान न करता, उत्पन्न घेणारी शेती म्हणजे ‘शाश्वत शेती’. शेतीक्षेत्रात पडणाऱ्या पावसाला शेतातच मुरवून घेणारी, शेतातली माती पावसावाटे नदीत गाळ म्हणून वाहू न जाऊ देणारी, कोणतीही रासायनिक खते न वापरणारी, शेतातली जैवविविधता जपणारी आणि त्यायोगे सकस पीक काढणारी ती शाश्वत शेती. सुदैवाने आमच्या इथल्या काही शेतकऱ्यांना हा विचार मुळातून पटलेला आहे आणि ते या प्रकारेच शेती करीत आहेत.”


आता रसायनं, खतं न वापरता शेती कशी करायची, पिकांवर कीड तर येणारच ना, हा प्रश्न विचारल्यावर डॉ. हेडा म्हणाले, ” मुळात कीड हा आपला शत्रू आहे आणि तो रासायनिक कीटकनाशके फवारूनच संपवावा लागेल, हा विचार आम्हांला पटत नाही. पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कीटकांना रोखण्याचं काम निसर्ग स्वत: करत असतो. पूर्वीच्या काळी शेतावर येणारे वेगवेगळे पक्षी, साप या कीटकांना आणि शेतातल्या उंदरांना संपविण्याचे काम करायचे, त्यांची संख्या आपोआप नियंत्रित राहायची. आधुनिक काळात मात्र आपण कृषी क्षेत्रातही बेसुमार वृक्षतोड करून पक्षी- प्राण्यांचे अधिवास नष्ट करतोय, मग पक्षी येणार कुठून? म्हणूनच बांधावरची झाडं टिकली पाहिजेत हा आमचा आग्रह असतो. गेल्याच वर्षी त्यातून आम्ही 600 फळझाडं शेतकऱ्यांच्या बांधावर लावली आहेत, यातून शेताला उत्पन्नही मिळेल आणि काही प्रमाणात कीटकांच्या धाडींना रोखण्याचेही काम होईल.”


अर्थात शाश्वत शेतीचा पुरस्कार करणारे शेतकरी कीटकांना रोखण्यासाठी फक्त पक्ष्यांवर अवलंबून नाहीत, त्याचं प्रात्यक्षिकच तिथल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी दाखविलं. त्यांनी ‘डी कम्पोझर’ नावाचं शेतीला सुपीक बनवणारं खताचं प्रात्यक्षिक दाखविलं. “2 किलो गूळ, गायीचं शेण, थोडं तेल, बेसन आणि 200 लीटर पाणी एका ड्रममध्ये एकत्रित करून काही दिवस आंबवलं जातं. त्यातून तयार होणारं डी कम्पोझर पाण्यात मिसळून आम्ही पिकांना देतो. मुळात गायीच्या शेणात जमिनीचा कस वाढविणारे अनेक चांगले घटक असतात, या आंबविण्याच्या प्रक्रियेने ते चांगल्या प्रकारे सक्रिय होतात. सर्व प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी याचा चांगला उपयोग होतो.” बाळू बोराळे आणि गजानन काळे सांगत होते. ”कीटकनाशकापेक्षा आमचा कीटकरोधकावर जास्त विश्वास आहे, त्या कीटकरोधकासाठी आम्ही ‘दशपर्णी’ हे शेतातच तयार केलेलं औषध वापरतो. त्यासाठी ज्या वनस्पतींना शेळी तोंडही लावत नाही अशा 10 प्रकारच्या वनस्पतीचा पाला उदा. सीताफळाची पानं, अडुळसा, मारूख, निरगुडी आणि हळद, लवंगी मिरची, तसेच गोमूत्र आणि शेण यांचं मिश्रण करून ते 40 दिवस आंबवतो. या द्वारे जे दशपर्णी औषध तयार होतं, ते कीड पडलेल्या वनस्पतीवर फवारतो. मावा, तुडतुडे यासारख्या शेतकऱ्यांना त्रास देणारी उपद्रवी कीड यामुळे कमी होते.” संजय भगत सांगत होते.
या ग्रीन्झा गटाचा आणखी एक आगामी उपक्रम म्हणजे ‘शेती अवजारांची बॅंक’. छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसारखी यंत्रं स्वत: खरेदी करणं परवडत नाही. 25-30 किमी परिघाच्या अंतरावरील अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर ट्रॅक्टर, रोटावेटर, हाडांबा यासारख्या यंत्रं खरेदी केली आणि नाममात्र भाड्याने ती आसपासच्या शेतकऱ्यांना भाड्याने दिली तर शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर होईल. यासाठी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेकडून त्यांना 26 लाख रूपयांची ग्रॅन्ट मंजूर झालेली असून लवकरच ही बँक प्रत्यक्षात आकाराला येईल.
डॉ. हेडांच्या पुढाकारातून उभे राहिलेले आणखी एक उल्लेखनीय काम म्हणजे, कारंजा शहरात वनविभागाच्या सहकार्याने त्यांनी उभारलेले मानवनिर्मित जंगल. सुमारे 100 एकरांच्या ओसाड पडलेल्या जागेत 2009 साली तत्कालीन आमदार प्रकाश डहाके आणि वनविभागाचे अधिकारी अशोक कविटकर यांच्या सहकार्यातून आज कारंजा शहराच्या मधोमध हिरवेगार जंगल उभारले गेले आहे. त्यात अगदी कटाक्षाने जैवविविधता जपत त्यांनी विदर्भातील स्थानिक झाडांचीच लागवड केली आहे. छानशी आमराई आहे, 27 नक्षत्रांच्या नावाची झाडे लावून नक्षत्रवन उभारले आहे आणि विदर्भ ज्या नावाने ओळखला जातो त्या गवताचीही लागवड आणि पुरेशी वाढ होईल याची काळजी घेतली गेली आहे. ज्या ठिकाणी पूर्वी भकास जमीन होती तिथं आता हिरवाईत मोर, नीलगायी, वेगवेगळे प्राणी- पक्षी यांचा वावर वाढलाय.
डॉ. हेडा म्हणतात, “आपल्या कार्बन फूटप्रिंटसाठी कुठल्या तरी गडचिरोलीच्या जंगलांवर का अवलंबून राहायचं? तुमच्या शहरातील ओसाड जागा, गायरानं यांच्यावर तुमचे स्वत:चे असे छोटेसे का होईना जंगल उभारा, बरेचसे प्रश्न आपोआप सुटतील.”

– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Leave a Reply