शिकणं केवळ शाळेत होत नाही

स्टिव चार वर्षांचा आहे. शिकणं केवळ शाळेत होत नाही. आजी-आजोबांचं वागणं, मित्रांशी संवाद, शेजाऱ्यांचं वर्तन हे सगळं पाहात तो स्वत:ला शिकवतो. अन्यथा नास्तिक आईवडिलांचा हा मुलगा गावाकडच्या एका देवळात सहज गेला असताना, बाहेरून गवत आणून ते मूर्तीवर वाहताना दिसला नसता!  माझ्यावर झालेले मानवतेचे संस्कार त्याच्यापर्यंत पोचवायला त्याच्या शब्दसंग्रहापासूनच विचार केला. फिरायला निघालं की कडेवरच्या बाळाला आपण दाखवतो, हे घर… ही शाळा… तसं जिथे माणसं धार्मिकतेनं जातात त्या ठिकाणासाठी ‘रिलीजन’ हा शब्द सांगितला. हा मठ, हे देऊळ असं काही नाही. त्यामुळे त्याच्या मनातही संकल्पनेपुरता ‘धर्म’ हा शब्द राहिला.
जाणीवपूर्वक संगोपन केल्याच्या परिणामी ‘मी अवघ्या घरादाराचा केंद्रबिंदू आहे,’ असं स्टीवला वाटू लागलं. जन्माआधीच बाळाचं नाव इंग्रजी ठेवायचं, असं ठरवलं होतं आणि आता स्टीवच्या वर्गातही इंग्रजी नावांची मुलंमुली आहेत. म्हणजे अशा नावांचा ट्रेंडच आहे, म्हणायला हरकत नाही. 

स्टीवची शिकण्याची माध्यमं अनेक. भाषाही अनेक. टीव्हीवर हिंदी-मराठी, घरात-शेजारी मराठी, यू ट्यूबवर माझ्याबरोबर फिल्म्स बघताना इंग्रजी अशा भाषांमधून तो जग समजून घेत आहे. माहिती ज्या भाषेतून, ज्या प्रकारे मिळते त्यातून जाणिवा विकसित होतात. या सगळ्यातून तो खूप काही आत्मसात करत आहे. हे लक्षात घेतलं तेव्हा शाळा कोणत्या मीडियमची हवी, हा प्रश्न उरला नाही. चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम शिकवतात, तिथे त्याला घातलं. माध्यमाविषयी मतमतांतरं असावीत, हा काळ आता राहिलेला नाही. शहरी राहणीमानामुळे शेत-निसर्गाशी संबंधित खूपशा गोष्टींपासून मुलं वंचित असतात. मी शाळेतून घरी पायी यायचो, वाटेत रेंगाळायचो… बोरं पाडायचो… स्टीव वाहनानं घरी परततो. माती-झाडांशी संबंधित गोष्टी त्यानं अनुभवाव्यात यासाठी त्याला ग्रामीण भागात आवर्जून नेतो. याउलट पत्नी ज्योती त्याला सुटीच्या दिवशी मॉलमध्ये फिरायला नेते. ती फायनान्स क्षेत्रात आहे. स्पर्धेच्या, भपक्याच्या ज्या जगाशी त्याचा व्यवहार होणार आहे, त्याच्यापासून फटकून राहू नये, हा हेतू. सध्या स्टीव दोन्ही एंजॉय करतोय. माझ्या अमेरिकेतल्या सहकारी डेबी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेम मुलांना लाडावत नाही. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी वस्तू देण्याची सवय मात्र मुलांना लाडावते. बाबाचं प्रेम हे कधीही वस्तूच्या स्वरूपात नसतं, हे स्टीवला पक्कं माहीत आहे.
 माझ्या आणि त्याच्या जगात फरक आहे. पदवी, कौशल्य शिकवणारा अभ्यासक्रम, पुढे चांगली नोकरी असे आमचे दिवस होते. जागतिकीकरणाने चांगलाच आकार घेतलेल्या दिवसांत स्टीव जन्मला आहे. चंगळवाद हा त्याच्या समवयस्कांचा स्वभाव असेल. रोजगारनिर्मिती त्याला स्वत: करायची आहे. पालकत्वाची जबाबदारी यामुळे वाढते याची आम्हाला जाणीव आहे.
इंटरनेटवर अति विसंबल्यामुळे जेव्हा ते उपलब्ध होत नाही, तेव्हा मूल अस्वस्थ होतं, हे आव्हान आमच्याही वाट्याला येतं. त्यामुळे जाणिवांना स्पर्शणाऱ्या कृती करण्यावर भर देत आहोत. स्टीवच्या बालवयाचा पहिला टप्पा आहे. तो पुढे सरकेल तसतसं आमचं पालकत्वही प्रगल्भ होत जाईल. (शब्दांकन : सुलेखा नलिनी नागेश)
 naviumed@sampark.net.in

– राहुल बनसोडे