शिकवण्यापेक्षा शिकू देणं गरजेचं!

 

“काय गं काय करताय?”
“१५ ऑगस्टसाठी कार्यक्रम बसवतोय. तुम्ही नका कोणी वर येऊ हं.”
“अभ्यास न करता दोनदोन तास दारं लावून कसली नाटकं करता गं?”
महिन्याभरापासून घरात हे संवाद सुरू होते. माझ्या मुली गार्गी, गायत्री आणि त्यांची मैत्रीण तनू रोज वरच्या रूममध्ये ‘कसलीतरी’ प्रॅक्टिस करायच्या. घरातलं वेगवेगळं साहित्य घेऊन आमच्या दृष्टीनं वर ‘काहीतरी’ करायच्या. त्यासाठी घरातल्यांचा न चुकता ओरडा. गार्गी, गायत्री ७ वीत तर तनू ५ वीत.


मी गेल्या दोनतीन वर्षांपासून एका शाळेच्या प्रोजेक्टवर काम करतोय. त्यामुळे बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, ज्ञानरचनावाद या गोष्टींवर विचारमंथन सुरू आहे. माझा दादा, शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रशांत गावंडे यांच्यासोबत नेहमीच चर्चाही सुरू असते. त्यामुळे मुली स्वतःहून जे करतात ते त्यांना करू द्यायचे. त्यांना टोकायचे नाही, सतत अभ्यासासाठी घोषा लावायचा नाही, रागवायचे नाही असे काही नियम मी स्वतःला घालून दिले. पालक म्हणून जोपर्यंत आपण मुलांवर विश्वास टाकणार नाही, तोपर्यंत त्यांच्या पंचेंद्रियांना चालना मिळणार नाही. त्यामुळे मुली वरच्या खोलीत कोणता ‘ड्रामा’ बसवताहेत, हे पाहण्याच्या भानगडीत मी पडलो नाही.
१५ ऑगस्टला ‘चीफ गेस्ट’ म्हणून येण्याचं ‘प्रॉमिस’ तेवढं दिलं. त्या आधी तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने या तिघींचीही जरा चूळबुळ सुरू होती. शाळेत (सुसंस्कार विद्या मंदिर) एरवीसारखं ध्वजवंदन होणार नव्हतेच. परंतु अँपवर विद्यार्थ्यांसाठी ‘लाईव्ह’ कार्यक्रम होता.
मुली सकाळीच उठून या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदा ‘युनिफॉर्म’ घालून तयार झाल्या. सर्व शिक्षक, मित्रमैत्रिणींना बघून दोघीही किती ‘एक्साईट’ झाल्या ते मी स्वतः बघितलं. शाळेत जाता येत नसल्याची खंत दोघींच्याही चेहऱ्यावर दिसत होती. (दोघीही शाळेत ‘एव्हरेज स्टुडंट कॅटेगरी’ मोडतात, असं त्यांच्या रिपोर्टकार्डवरून तरी आम्हाला आजवर वाटत आलंय) पण शाळा बंद असताना स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी घरी जे भारी ‘परफॉर्म’ केलं ते बघून ज्ञानरचनावादाचे महत्त्व अधोरेखित झालं.
मुलं शिक्षकांपेक्षाही वेगळा विचार करू शकतात, हा विचार आजही आपल्या समाजात मान्य नाही. मुलांच्या कल्पनेचं ओझं कोणत्याच शाळा पेलू शकत नाही, याची जाणीव आम्हालाही उशिरा झाली. गार्गी, गायत्री आणि तनू यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जो ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम बसवला त्याला ज्ञानरचनावादाचे अनेक पैलू जोडले आहेत. अर्थात हे सगळं त्या निरिक्षणातून शिकल्या. कार्यक्रमात सर्व काही तिघींनीच पार पाडले. कार्यक्रमासाठी या तिघींचेही पालक म्हणून आम्ही, शेजारच्या दोन व्यक्ती आणि परीक्षणासाठी मी मुद्दामहून बोलावलं ते डॉ. प्रशांत गावंडे.
मुलाबाळांच्या किलबिलाटाशिवाय स्वातंत्र्यदिन ‘दीन’ होतोय की काय असे वाटत होते. पण गार्गी, गायत्री, तनू यांनी केलेलं सादरीकरण यामुळे दिवस उत्तम साजरा झाला.
डॉ. प्रशांत गावंडे यांचे विचार आमच्या मुलींना स्वतः शिकण्याची, शिकण्यातून अनुभव घेण्याची नवी दृष्टी देऊन गेले. मुलं निरीक्षणातून शिकतात. त्यांना शिकवण्यापेक्षा शिकू देणं गरजेचं आहे, एवढं पालक म्हणून आम्ही नक्कीच शिकलो.

-नितीन पखाले, यवतमाळ

Leave a Reply