”दात घासण्यापासून अंघोळ, लादी पुसण्यासाठीची रसायनं अशा दैनंदिन क्रियांमधून आपण मोठ्या प्रमाणावर नद्या प्रदूषित करतो. पाणी शुद्ध करण्यासाठी बऱ्याचदा आवश्यकतेपेक्षा जास्तच क्लोरीन वापरलं जातं.” डॉ प्रमोद मोघे सांगत होते.
डॉ प्रमोद मोघे. वय ७८. निवृत्त झाल्यावर गेली १८ वर्ष ते रसायनांबाबत जागृती करत आहेत. १९६३ मध्ये पुणे विद्यापीठातून ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये पीएचडी. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शेती, रसायने,कीड,कीटकनाशके,सूक्ष्म रसायन निर्मिती,कापड रंग,नैसर्गिक रंग यावर संशोधन. ८० च्या वर प्रक्रिया विकसित. ४० देशी आणि विदेशी पेटंट नावावर. ७ पुरस्कार. वर्ष २००० मध्ये बुऱ्हाणी फाउंडेशन -नीरी पुरस्कारानं सन्मानित.
काम करत असतानाच मोघे सरांना पाणीप्रदूषणाबाबत चिंता वाटत होती. मग त्यांनी ‘ डोळस विज्ञान’ गट सुरू केला. शुद्ध पाणी म्हणजे काय? तर पाण्याच्या शुद्धतेची ४० परिमाणं आहेत. रसायनं न वापरता पाणी शुद्ध करण्याचे अनेक उपाय आहेत, जसे की ते दोन-तीन तास सूर्यप्रकाशात ठेवणे, शेवग्याच्या सुकलेल्या बियांचा वापर… याबाबत ते जागृती करतात. ‘धोका…पाणी पिताय सावधान’, हे पुस्तक त्यासाठी सरांनी लिहिलं आहे.
पाण्यात रसायनं जाण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी लादी पुसण्यासाठी , बाथरूम स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक क्लिनर्स त्यांनी तयार केली आहेत.
शेतीत टाकाऊ काहीच नसतं. सेंद्रिय शेती ही खरी शेतकऱ्याला तारणारी. हवामानामुळे शेतीचं नुकसान झालं तरी शेतकरी तगू शकेल, यासाठी ते मार्गदर्शन करतात. देशात आजही विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अभाव असल्याची खंत त्यांना वाटते. तरुण पिढी ही खंत दूर करेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
डॉ.प्रमोद मोघे 9325380093
– संतोष बोबडे
Related