शेतकऱ्याने केली फवारणी यंत्राची निर्मिती
लोहारा तालुक्यातील उदतपूर गाव. इथला तरूण शेतकरी व्यंकटराव माधवराव पाटील. व्यंकट यांनी बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. घरी शेती होतीच. त्यामुळे पुढे शेतीतच लक्ष घालायचं ठरवलं. त्यांचे वडील माधवराव पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन होतंच.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस कमी होत चाललेली मजुरांची संख्या, त्यामुळे शेतकऱ्यांवर पडणारा कामाचा ताण हे सगळं व्यंकट यांच्या नजरेसमोर होतं. या परिस्थितीत शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर खूप उपयुक्त ठरेल, या विचाराने व्यंकट यांनी शेतीत यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.
व्यंकटराव पाटील यांनी दहा एच. पी. च्या पाॅवरविडरवर अगदी पडून असलेल्या साहित्याचा वापर करून फवारणी यंत्र विकसित केलं. खरीप सोयाबीनपासून त्याचा प्रत्यक्ष वापरही चालू केला. दररोज कमीत कमी वीस एकरची फवारणी सध्या होत आहे. फवारणीसाठी सतत भेडसावणाऱ्या मजुरांच्या समस्येवर त्यांनी एक कायमस्वरूपी पर्याय शोधला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सास्तूर येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात व्यंकटराव पाटील यांनी तयार केलेले दहा एच. पी. च्या पाॅवरविडर फवारणी यंत्राची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी स्वतः दिली. यावेळी उपस्थित अधिकारी, शेतकरी यांनी त्यांचे कौतुक केले होते.
व्यंकट म्हणतात, “सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मंजूर टंचाईने ग्रासले आहे. शेती यांत्रिकीकरणात मोठी शेती अवजारे तर आली परंतू लहान शेतीअवजारांची आजही उणीव आहे. यावरचा उपाय म्हणून आम्ही B.C.S कंपनीचे 10 h pचे पावरव्हिडर दोन-तीन वर्षांपूर्वीच अंतर्गत मशागतीकरीता आणले होते. यावरचा आपल्याला फवारणी यंत्र तयार करता येईल का हा विचार मनात आला आणि लागलीच कामाला सुरुवात केली.
घरी अगोदरच आणलेलं फवारणी यंत्र होतेच. जूनं स्टिल वर्कशॉपमध्ये हवं तसं सांधून घेतलं आणि त्याचा वापर चालू केला आणि पहिल्याच प्रयत्नात ही कल्पना कमालीचे यशस्वी झाली. शेतकऱ्यांनी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत निराश न होता तिच्याकडे एक संधी म्हणून पाहिलं तर खूप मोठं परिवर्तन सहज शक्य आहे. मी बनवलेल्या या फवारणी यंत्राने मोठ्या समस्येवर मात केलेली आहे. एक लिटर डिझेलमध्ये एका तासात चार एकर क्षेत्रावर फवारणी होत आहे. हे फवारणी यंत्र कोणीही सहज चालवू शकतो. दहा नोजलद्वारे एक समान फवारणी होत आहे.”
शेतकरी बांधवांनी गरजेनुसार यंत्रे बाजारात उपलब्ध असतील तर ठीक, नाही तर गरजेनुसार बनवून वापरावीत. पण शेती मात्र यंत्रावरच करावी. कारण ती आता काळाची गरज आहे असं व्यंकटराव पाटील म्हणतात.
– गिरीश भगत, लोहारा, जिल्हा उस्मानाबाद

Leave a Reply