शेतीतली बाराखडीही माहित नसताना आलेली परिस्थिती स्वीकारून शेती यशस्वी करणारी!
वयाच्या १५व्या वर्षी १९९० साली संगीताताईंचा साकोरे मिग, निफाड, जिल्हा नाशिक इथल्या अरुण बोरस्ते यांच्याशी विवाह झाला. १९९१ साली पती अरुण यांनी आपली बँकेची नोकरी सोडून शेतीचे काम बघायला सुरुवात केली. २०१४ साली नुकतीच द्राक्ष बागांची छाटणी झाली होती आणि पती अरुण यांचं नवरात्रीच्या काळात रक्तदाब कमी होऊन निधन झालं. आणि अचानकच हसतं खेळतं कुटुंब उध्वस्त झालं. संगीताताईंवर तीन मुली आणि एक मुलगा यांची आणि ३० लाख रुपयांचं कर्ज फेडायची जबाबदारी आली. त्यामुळे हा काळ अतिशय कठीण होता. संगीताताईंनी या परिस्थितीशी लढा द्यायचं ठरवलं. आता त्यांचं केवळ एकच लक्ष्य होतं, शेतीत यश मिळवून चारही मुलांचं भविष्य घडवायचं. पती अरुण होते तोवर द्राक्ष बागेतल्या कुठल्याही कामाविषयी संगीता ताईंना माहिती नव्हती. संगीता यांचे वडील नोकरीत असल्याने त्यांचं वास्तव्य नाशिक शहरातच होतं. त्यामुळे शेती म्हणजे काय ते माहित असण्याचा प्रश्नच नव्हता. लग्न झाल्यावर शेतात कांदे, उसाचं उत्पादन घेतलं जात असल्याचं त्या पाहत होत्या. पण, शेतीची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. लग्नाआधीचं सासऱ्यांचं निधन झालेलं होतं. आणि पतीचं निधन होण्याच्या तीन महिने आधी सासूबाईंचाही मृत्यू झाला. त्यामुळे संगीता यांनाच घरातील कर्त्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरावं लागलं.
अरुण यांचे काका रमेश आणि पुतणे सचिन तसंच शेती मार्गदर्शकांच्या मदतीने संगीता यांनी शेती सांभाळायला सुरूवात केली. शेतीतल्या बारीक सारीक गोष्टी शिकून घ्यायला सुरवात केली. जिद्दीने काम करत शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत संगीता ताईंनी परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. द्राक्षात थॉमसन, गणेश अशा विविध जातींची लागवड करत, चांगलं उत्पादन त्या मिळवू लागल्या. हळूहळू चित्र पालटलं आणि डोक्यावर असलेलं कर्ज पूर्ण फिटलं. चारही मुलांना उत्तम शिक्षण देत दोन मुलींचं लग्न देखील त्यांनी लावून दिलं. संगीता ताईंची मोठी मुलगी बीई काम्प्युटर झाली. दुसरीने मायक्रो बायोलॉजीत एमएससी केलं, तिसरीने एम. ए. इंग्लिश केलं तर मुलगा सध्या अकरावीत शिकत आहे.
पतीच्या निधनानंतर आजवरचा संगीता ताईंचा हा प्रवास अतिशय खडतर असला तरी आज त्यांच्या सारख्या अनेकांच्या आयुष्यात एक आदर्श ठेवणारा आहे.
– भाग्यश्री मुळे, नाशिक,