शेतीशाळा

सागर जाधव एका कंपनीत इंजिनिअर. चांगली नोकरी असली तरी व्यवसायाची आवड. त्याला शेळीपालन हा व्यवसाय सुरु करायचा होता. तो म्हणतो, मी विविध संस्थांमधून माहिती मिळवली पण ती सविस्तर नव्हती. तेवढ्यात मला ‘संडे स्कुल ऑफ ऍग्रो एंटरप्रेनरशिप’बद्दल माहिती मिळाली. तिथे ‘शेळीपालन’ कार्यशाळेसाठी नाव नोंदवलं. आणि माझा उद्देश सफल झाला. हा व्यवसाय कसा करावा, शेळीपालनाच्या पध्दती, शेळयांसाठी निवारा, आहार, आजार याबरोबरच लसीकरण व बाजारपेठ अशी सगळीच माहिती मिळाली. शंकानिरसन झालं आणि आता शेळीपालन व्यवसायात याचा मला फायदा होत आहे’.

कृषी व पूरक उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीच हा उपक्रम सुरु झाला. नाशिक येथील ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनची ही संकल्पना. संस्थेचे अध्यक्ष आहेत संजय न्याहरकर. प्रत्येक महिन्यांच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी नाशिक इथं ही कार्यशाळा भरते. कृषी व कृषी संबंधित शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषीपर्यटन, नर्सरी, पॉलीहाऊस/शेडनेटशेती, बेकरी, लँडस्केपिंग, शेतकरी उत्पादक कंपनी, सफरचंद, बोर, ड्रॅगन फळ, अंजीर लागवड, सेंद्रिय शेती यांसह विविध व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन केले जाते. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक यासाठी उपस्थित असतात. आजपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती, हायड्रोपोनिक चार निर्मिती या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली आहे. 
संजय न्याहरकर म्हणतात, कृषी हे कष्टाचं क्षेत्र. याला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. तसंच जोडधंदाही हवा. त्यामुळे अनेक नव्या संधी निर्माण होतील. रोजगार निर्मितीही यातून शक्य आहे. तरीही आज युवक याकडे वळताना दिसत नाहीत. बेरोजगार तरुणांना कृषी व जोडधंद्याची माहिती उपलब्ध करून दिली तर ते स्वतःचा उद्योग सुरु करू शकतात, याच उद्देशाने ‘संडे स्कुल ऑफ ऍग्रो एंटरप्रेनरशिप’ ची सुरुवात डिसेंबर २०१६ मध्ये केली’.
या उपक्रमातून कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यात येते. कौशल्यावर आधारित कृषी व कृषिपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. स्वयंरोजगार निर्मितीसाठी सहकार्यही केले जाते.

– मुकुंद पिंगळे.