संकटातली संधी

 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. परंतु यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतातील माल बाजारपेठेत न्यायला अडचणी निर्माण झाल्या. तसंच लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत ही म्हणावी तेवढी मागणी नव्हती. त्यामुळे शेतातील, फळबागेतील मालाचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. सगळ्या शेतकऱ्यांमधलेच एक लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ज्ञानेश्वर कारभारी. त्यावेळी त्यांच्या शेतात पावणेतील एकरावर केळी उभी होती. केळी तयार झाली पण त्याचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.

ज्ञानेश्वर यांची एकूण 35 एकर शेती आहे. वडिलांपासून ते लहानपणापासूनच शेती करतात. नेहमी शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. शेतात असलेल्या मुबलक पाण्यामुळे त्यांनी आपल्या शेतात यावर्षी पाच एकर केळी, तीन एकर पेरू, दोन एकर मिरची, साडेचार एकर ऊस आदींची लागवड केली. आता मात्र केळीचं काय करायचं हे प्रश्न होता. केळीचं नुकसान होणार हे दिसत होतंच. शेवटी गाव व परिसरात वाटप करू म्हणजे एक चांगले काम होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी लगेच कामाला सुरुवात करून बागेतील केळी काढली व एका जीप मध्ये भरून ती केळी गावात प्रत्येकाच्या घरी पोहोच केली. तरीही केळी शिल्लक राहात होती. त्यामुळे या शिल्लक दोन एकर केळीचे चिप्स बनवायचे व ते विक्री करू असा संकल्प कारभारी कुटुंबियांनी केला. त्यानुसार या कामासाठी एकही मजूर न लावता घरातील सर्व सदस्यांच्या मार्फत बागेतील केळी तोडणे, सोलणे, त्याचे बारीक तुकडे करणे, तळणे व त्यास मीठ मसाला लावून पॉकेट तयार करण्याचे काम सुरू केले. चिप्स तयार झाल्यानंतर स्वतः ज्ञानेश्वर कारभारी हे परिसरात जाऊन घरोघरी या चिप्सची विक्री करीत आहेत. केळीचे हे चिप्स चवदार लागत असल्याने ग्राहकाकडूनही या चिप्स ची मोठी मागणी आहे. या चिप्स विक्रीतून आत्तापर्यंत जवळपास ७० हजार रुपयांचे उत्पन्न झाल्याचे शेतकरी कारभारी यांनी सांगितले.


लॉकडाऊनमुळे खचून न जाता मोठ्या जिद्दीने सुरुवात केलेल्या या व्यवसायाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळत आहे. ज्ञानेश्वर म्हणाले, “यावर्षी पहिल्यांदाच केळी लावली होती. त्यात हे संकट आल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केळीचे चिप्स बनवायचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत जवळपास ७० हजार रुपयांची चिप्स विक्री झाली आहे. या चिप्सला मोठी मागणी आहे. त्यामुळे पुढील काळात मशिनरी आणून हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे.”

– गिरीश भगत, लोहारा, उस्मानाबाद

Leave a Reply