संकटातून संधी हेरली…

संकटात संधीची दारं उघडली जातात, असं म्हटलं जातं. व्यक्तीपुरूप हा अनुभव वेगळा असेल कदाचित! पण जालन्याचे अनंत साळी यांना सध्याच्या ‘लॉकडाऊन’मध्ये समाजसेवेसोबतच व्यवसाय संधीची दारं कशी उघडता येतात, याचा पाठ त्यांचा लहानगा मुलगा मानसने घालून दिला.
अनंत साळी सांगतात, ‘गेल्या महिन्यापासून आम्ही हॅण्डमेड साबण, बॉडी वॉश, फेसवॉश, हॅन्डवॉश आणि सॅनिटायझर बनवणं सुरू केलं. ही उत्पादनं हर्बल असावी, हे आम्ही कटाक्षाने पाळलं. मुंबईत अनेक ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष काम बघितलं आणि जालन्यात हा प्रयोग सुरू केला. त्यासाठी मुंबईहूनच कच्चा माल आणला. घरी बनवलेलं उत्पादनं कसं आहे, हे पडताळण्यासाठी जालना, औरंगाबाद आणि मुंबईतील जवळच्या मित्रांना सॅम्पल दिले. उत्पादन उत्तम असल्याचा सर्वांचा निर्वाळा दिला आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतून यापूर्वी आणलेला कच्चा माल संपल्याने पुन्हा मुंबई जाण्याची तयारी सुरू असतानाच जनता कर्फ्यू लागला. लागलीच टाळेबंदी लागल्याने आमचा उद्योग सुरू होण्यापूर्वीच काहीसा अडखळला’.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सुरक्षितता म्हणून गोरगरिबांनी काय करावं, असा प्रश्न साळी यांचा लहान मुलगा मानस याने उपस्थित केला. कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर हे उपाय शासनाकडून सुचविले गेले. लॉकडाऊनमध्ये देशभर अडकलेल्या लोकांनी स्वच्छता कशी राखावी, असा प्रश्न मानसने उपस्थित केला. त्यासाठी घरात शिल्लक असलेले हॅण्डमेड साबण, हॅन्डवॉश अशा नागरिकांना देण्याचा प्रस्ताव त्यानेच सुचवला. हात वारंवार साबणाने स्वच्छ धुतल्यास या संसर्गापासून बचाव होईल, हे त्याने सांगितले. मानसच्या या तळमळीतून घरात शिल्लक असलेले साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायझर अशा गरजू लोकांना मोफत वाटण्याचा निर्णय अनंत यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी मानस स्वत: मास्क लावून अनंत यांच्यासाठी मास्क घेऊन सकाळीच तयार होता.
यासंदर्भात सांगताना अनंत साळी म्हणाले, केवळ साबण, सॅनिटायझर, हॅण्डवॉश देऊन चालणार नव्हते. गरजवंतांना खाण्यासाठी वेफर्स पॅकेट घेतले. हे सर्व साहित्य घेऊन गरजू, उपाशी लोक गाठले. मानसने प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसण्यास सांगितलं. नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला लावून खाण्यासाठी वेफर्स दिले. यापुढे खाण्याआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करायच्या सूचनाही दिल्या. घरगुती वस्तूंचा सामाजिक कार्यात उपयोग करून घेण्याची मानसची ही संकल्पना मला खूप काही शिकवून गेली आहे, असं अनंत अभिमानाने सांगतात. अशा संकटकाळात मुबलक साहित्य नसल्याने अधिकाधिक गरजूंपर्यंत आपण पोहचू शकलो नाही, याचं शल्य असल्याचंही ते सांगतात. आजच्या संकटकाळात शासन, प्रशासन, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शेतकरी, दानशूर लोकं, स्वयंसेवी संघटना खूप मोठे काम करीत आहेत. त्या तुलनेत आपलं काम अगदीच नगण्य आहे. पण या कामाने भविष्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झालं की पुन्हा नव्या जोमाने साबण, हॅण्डवॉश, सनिटायझरच्या हर्बल उत्पादनांकडे वळून साथींच्या आजाराशी लढणाऱ्या आरोग्यदायी साखळीचा भाग बनू, असा विश्वास अनंत साळी यांनी व्यक्त केला.
अनंत साळी, जालना यांचा संपर्क – 94 222 15 336

– नितीन पखाले