“संघटनेची गाडी ऽऽ ऽऽ पुढे…

‘पोलिस’ ही संकल्पना प्रतिकच्या बालमनावर कोरली गेली होती. तो पोटात असतानाच दोनदा तुरुंगवास, १९ दिवसांचा असताना अटक झालेली. नैसर्गिक संसाधनांवर आदिवासींचा अधिकार, विस्थापितांचं न्यायपूर्ण पुनर्वसन यासाठीच्या चळवळीने भारावलेले आम्ही. मोर्चे सततचे. पोलिसांकडे दगड भिरकावत प्रतिक त्यांना सांगायचा, “तुम्ही आम्हाला नको..आमच्या माणसांना तुम्ही त्रास देता.” “संघटनेची गाडी ऽऽ ऽऽ पुढे… पोलिसांची गाडी ऽऽ ऽऽ मागे ऽऽ…” हे खेळातही चालायचं. हा तिरस्कार घालवण्याची संधी एकदा आली. संघटनेच्या दशकपूर्ती कार्यक्रमात एक मोठे पोलिस अधिकारी मंचावर होते. प्रतिकला म्हटलं, “बघ, तेही पोलिस आहेत नि आपल्याबरोबर बसलेत. म्हणजे पोलिस चांगले असतात.” तर तो थेट मंचावर आला. म्हणाला, “आधी खाली उतरा ! आमच्या आदिवासी मोर्चेकऱ्यांना तुम्ही त्रास देता.” पालकत्वाची अशी काही किंमत चुकवावी लागेल, असं कामात झोकून देताना वाटलंच नव्हतं ! 

सन २०००. सरदार सरोवराची उंची वाढवण्यास हरकत नसावी, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्यावर आदिवासींच्या पुनर्वसनाच्या आंदोलनासाठी आम्हाला दिल्लीला जावं लागलं. १९ दिवसांच्या प्रतिकला मी ज्यांच्या भरवशावर सोडून गेले, त्या कम्युनबद्दल सांगायलाच हवं. १९९३ पासून आम्ही कार्यकर्ते नंदुरबारला कम्युनमध्ये राहातो. यात मी आणि संजय महाजन हेच एकमेव विवाहित जोडपं नि प्रतिक एकमेव अपत्य. “दिल्लीला निर्धास्त जा…आम्ही बाळाला सांभाळू..” असं सर्वांनी सांगितल्यामुळेच मी चळवळीची निकड पूर्ण करू शकले. त्यांनी बाळाला छान सांभाळलं. गरोदरपणातल्या तुरुंगवासामुळे बाळाला आलेलं आजारपणही काढलं. बाळानं दूध प्यायला सुरुवात केली की ते अन्ननलिकेतून उडून श्वासनलिकेत जायचं, न्युमोनिया व्हायचा. म्हणून माझं दूध काढून बाळाला पाजावं लागायचं. यातले व्यापताप स्मितानं सांभाळले. ती, दीपाली, सुजाता या नेतृत्वगुण असलेल्या, स्वतंत्र विचारांच्या, संसाराचा अनुभव नसलेल्या. पण बाळाला सांभाळण्यात खोट नव्हती. त्यांनी पोषक आहाराचा तक्ता केला. हयगय माझ्याकडूनच व्हायची. माझ्यात आईसुलभ नाजुक भावना मुळातच कमी. मग खटके उडायचे. मुली म्हणायच्या की तू बाळाकडे नीटसं लक्ष देत नाहीस. अगदी लहान असताना तो घरातल्या प्रत्येकच स्त्रीला ‘आई’ म्हणायचा. आज मला जाणवतं की मी प्रतिकला जन्म दिला. पण त्याची खरी आई संजयच. आजही तो मोकळा होतो बाबाकडेच ! आई म्हणजे घरातला बाहेर जाणारा सदस्य, असं त्याच्या मनात असावं… कारण तो म्हणायचा, “आमच्याकडे टीव्ही नाही कारण माझी ‘आई’ गरीब आहे.” 

दुसरीत असताना टिळक पुण्यतिथीच्या भाषणाच्या वेळी त्याने अट घातली की तू ‘पालक’म्हणून यायचं, पाहुणी म्हणून नाही. प्रत्यक्षात मुख्याध्यापकांनी मला मंचावर बसायला लावलं. प्रतिकच्या भाषणाची वेळ आली तेव्हा तो म्हणाला, “मी लोकमान्य टिळकांना वंदन करतो. मी भाषणाची तयारी केलीय पण आईनं अट पाळली नाही म्हणून मी भाषण करणार नाही.” कार्यकर्त्यांचं अपत्य म्हणून त्याचं शिक्षणही वेगळं. तळोद्यात आदिवासी नृत्य शिकला. घरी मराठी भाषा. नंदुरबारमध्ये गुजरातीचा प्रभाव. येणारे पाहुणे इंग्रजी, हिंदीत बोलणारे. या सर्व भाषा त्याला यायच्या. शिवाय अहिराणीसुद्धा.


शहरातल्या नातेवाईकांना त्याला मुख्य प्रवाहात न्यायचं होतं. त्याला जळगावला शिक्षणासाठी ठेवलं. मुख्याध्यापक असलेल्या माझ्या सासूबाईंनी तिथं बदली घेतली. संजयही त्याच्यासोबत राहिला. हा निर्णय माझ्या, प्रतिकच्या मनाविरुद्ध होता. समुपदेशकांच्या मदतीनं त्याचे तिथले दिवस आनंदी करावे लागले. त्या इंग्रजी शाळेत प्रवेशपरीक्षा होती. प्रतिकचा पेपर कोराच. तळोद्यात तो मराठीत शिकलेला. ही प्रश्नपत्रिका त्याला पूर्णपणे अनोळखी ! तेव्हा लक्षात आलं, प्रतिक हा त्या मुलांचा प्रतिनिधी आहे, ज्यांना कधी शिकवलंच जात नाही… शाळेत मास्तरच जात नाहीत… स्वातंत्र्य ज्यांच्यापर्यंत पोचलेलंच नाही! आणि त्यांना आपण नापास, ड्रॉपआऊट ठरवत सिस्टिमबाहेर काढतो! तळोद्यातल्या मुलांच्या शिक्षणासाठी कामाची प्रेरणा देणार्‍या घटनांपैकी ही एक.
संघटनेचं काम, माझं नेतृत्व विस्तारत असताना संजयने स्वतःतल्या कार्यकर्त्याला मुरड घालत पालकपण पेललं. मुलाची पौगंडावस्थेतली भावनिक आंदोलनं झेलली.
जळगावच्या शाळेत नंतर प्रतिक पहिलाही आला. वाचन करू लागला. चौथीपासून तो संजयसह पुण्यात आहे. शाळा प्रयोगशील, नावाजलेली. पण सधन कुटुंबातल्या मुलांनी सुरुवातीला प्रतिकला सामील करून घेतलं नाही. नंतर क्रिकेटमधलं कौशल्य, वर्गमित्रांच्या समस्या सोडवण्यात मदत यामुळे तो हवाहवासा झाला. आता त्याचं वाचनवेड चांगलंच वाढलं आहे. दीड हजार पुस्तकांची त्याची स्वत:ची लायब्ररी आहे. यंदा दहावीची परीक्षा देत असलेल्या प्रतिकला पुढे आर्थिक प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घ्यायचंय.
मी सामाजिक वर्तुळ स्वेच्छेनं निवडलं. परिवार मोठा असल्याचं समाधान कौटुंबिक पातळीवर बरीच किंमत मोजून मला मिळालं आहे.

प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा या आदिवासी संघटनेच्या प्रमुख

शब्दांकन: सुलेखा नलिनी नागेश