“हमारे हाथ सें कभी कोई खाना खा ले रहा है, ये भी कभी नही देखा था, पर आज आज देखो ना…हमने बनायी हुई डिशेस लोग खा रहे है और तारीफ भी कर रहे है..” डोळ्यातली आसवं पुसत तुलसी कौतुकाने सांगत होती. निमित्त होतं खास तृतीयपंथियांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या ‘ट्रान्सकुक कुकरी कॉम्पिटिशनचं’.
खास ‘तिच्या’साठी या कार्यक्रमाची ही भन्नाट आयडिया शोधून काढली ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी. “एकदा पुण्याच्या रस्त्यावरून कारने जात असताना, एका सिग्नलवर ती माझ्या गाडीसमोर आली आणि टाळी वाजवून पैसे मागू लागली. मी पैसे देण्यासाठी हात बाहेर केला, तेवढ्यात ती म्हणाली ‘आप विष्णू मनोहर सर हो ना? मै आपको पहचानती हूं, मै आपकी रेसिपीज फॉलो करती हूं और वैसा बनाती हूं!’ त्यावेळी डोक्यात विचार आला की, खरंच की, तृतीयपंथियांनाही पोट आहे, स्वयंपाक करावाच लागतो, आणि त्यातल्या किती तरी जणी चांगल्या शेफही असतीलच की! हिच्यासारख्याच या समुदायातील हौशी सुगरणींना आपण संधी दिली तर? त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या समुदायाशी जोडून घेता येईल. बस,…मग काय लगेच कामाला लागलो. शिवाय जून महिना हा LGBT Pride Month म्हणूनही साजरा केला जातो. या महिन्याइतका दुसरा कुठला चांगला मुहुर्त या स्पर्धेसाठी लाभणार होता? ” विष्णू मनोहर सांगत होते.
ही ट्रान्सकुक स्पर्धा ६ ते १४ जून दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, जळगांव, औरंगाबाद, नागपूर अश्या वेगवेगळ्या केंद्रावर घेण्यात आली. आणि १५ जून रोजी अंतिम फेरी नागपुरात घेण्यात आली. या स्पर्धैला तृतीयपंथीयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सहाही शहरातून निवडून आलेल्या स्पर्धकांना शेवटी अंतिम फेरीकरीता नागपूरला बोलावण्यात आले. एसी थ्री टायर ट्रेनचा प्रवास, राहण्या-खाण्याची उत्तम सोय, शिवाय त्यांना रामटेक या ऐतिहासिक स्थळाचे दर्शन आणि अर्थातच नागपूरच्या प्रसिद्ध अश्या सावजी जेवणाची मेजवानी सुद्धा देण्यात आली. हे सगळं बघून, ही सहल आणि स्पर्धा अनुभवून, “आम्हाला असं कधी राहायलाच मिळालं नाही, हे सगळं आमच्यासाठी स्वप्नच असल्यासारखं वाटतंय” असे उद्गार अंतिम फेरीसाठी नागपुरात आलेल्या तृतीयपंथियांनी काढले.
स्पर्धेची अंतिम फेरी नागपुरातील सिव्हिल परिसरातील जवाहर विद्यार्थी गृहात घेण्यात आली. अंतिम फेरीत १६ स्पर्धक होत्या, त्यांच्या एकुण ८ जोड्या केल्या गेल्या. या स्पर्धकांना मदत म्हणून एका शाळेतील विशेष मुलंही आली होते. यावेळी या दोन्ही दुर्लक्षित घटकांचा एकत्र उत्साह बघण्यासारखा होता. शिवाय खुद्द विष्णू मनोहर सुद्धा मदतीला होतेच. अंतिम फेरीत स्पर्धकांना दीड तासांचा वेळ होता. यात त्यांच्या मनाप्रमाणे एक गोड आणि एक खारा (नमकीन/ तिखट) आणि वेळ असल्यास इतर पदार्थ तयार करायचे होते.
या सगळ्या स्पर्धक पाककलेत तर निपुण होत्याच, पण त्या व्यतिरिक्त अन्य कलांमध्येसुद्धा पारंगत असल्याचं या या स्पर्धेदरम्यान लक्षात आलं. स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चव परिक्षकांनी घेतल्यानंतर विजेत्यांचे नावं घोषित करण्यात आली. यात प्रथम क्रमांक पटकवणारी जोडी, ही पुण्यातील निकिता मुख्यदल आणि निगार शेखची ठरली.या दोघींनी मिळून लच्छा पराठा, मिक्स व्हेज, व्हेज बिर्याणी, फ्रुट रायता, ग्रीन सलाद, ५ प्रकारचे फ्रुट शेक इ. मिळून तब्बल १२ चविष्ट पदार्थ तयार केले होते. निकिता ही गेल्या ८ वर्षांपासून ब्युटी पार्लर चालवत असून, तसेच ती फॅशन शोची विजेती सुद्धा आहे. तिचा पुण्यात वडापावचा स्टॉल सुद्धा आहे. निगारचा सुद्धा पुण्यात रिफ्रेशमेंट आऊटलेट आहे.
दुसरी विजेती जोडी ही नागपूरची मोहिनी आणि सोनु यांची. या जोडीने ११ प्रकारचे खाद्यपदार्थ बनवलेत. त्यात त्यांनी नागपूरी ठेचा आणि खास सावजी पद्धतीची पनीरची भाजी बनवली होती. मोहिनी ही २०२१ मधील मिस ट्रान्सब्युटी स्पर्धेची विजेती आहे. शिवाय ती मेकअप आर्टिस्ट, प्रोफेशनल डान्सर, समाजसेविका म्हणूनही कार्य करते. तृतीय क्रमांकावर पुण्याच्या संतोषी कदम आणि तलाश ठाकूर यांची जोडी आली, तर प्रोत्साहनपर पुरस्कार मुंबई येथील मयुरी व श्रीदेवी या जोडीला मिळाला.
या ट्रान्सकुक स्पर्धेचे आयोजन ‘विष्णूजी की रसोई’चे सर्वेसर्वा, शेफ विष्णू मनोहर आणि नागपुरातील स्व. मोरूभाऊ सातपुते बहुद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अंतिम फेरीच्या परिक्षक म्हणून मैत्रेयी लोवळेकर, अनुराधा हवालदार, विशाखा पवार, राधा सहस्रभोजनी आणि सुजाता नागपुरे होत्या. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख रकमेचे पारितोषिक देण्यात आले. आणि अर्थातच विष्णुजींनी स्वत: सर्व पदार्थ चाखले, कौतुक केलं आणि टीप्सही दिल्या.
या स्पर्धेतील दोन स्पर्धकांना ‘विष्णूजी की रसोई’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली असून, अजून एका स्पर्धकाला एका ब्युटी पार्लरमध्ये असिस्टंट मेकअप आर्टिस्ट म्हणून संधी देण्यात आली आहे. विष्णू मनोहर यांनी ही केवळ स्पर्धा नसून, तृतीयपंथियांच्या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या दृष्टीने एक प्रयत्न असल्याचे सांगितलेय. यांच्यातही आपल्यासारखेच कला, गुण, कौशल्ये असतात, आपल्यासारख्याच भावभावना आणि गरजा असतात. त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे आणि त्यांना चांगली संधी मिळाली पाहिजे, हे विष्णू मनोहर यांनी आवर्जून बोलून दाखवले.
या स्पर्धेला तृतीयपंथियांकडून इतका चांगला प्रतिसाद लाभला की, त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळवून देण्यासाठी अशीच ‘ट्रान्सकुक’ स्पर्धा आता देशभरात घेणार असल्याचेही विष्णू मनोहर यांनी सांगितले. विष्णू मनोहर यांना आणि सर्व तृतीयपंथियांना ‘नवी उमेद’ परिवाराकडून शुभेच्छा. लवकरच यांच्यापैकी कुणाचे तरी चांगले रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळो, हीच आशा.
लेखन: नीता सोनवणे, नागपूर
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/
#नवी_उमेद
#Transcook_Cookery_competition
#तृतीयपंथियांचीपाककृतीस्पर्धा
#शेफविष्णूमनोहर
#LGBTPridemonth
#नागपूर
#विष्णूजीकीरसोई