समाजसेवेची जाण, वाढवते वर्दीची शान

तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगत वसलेला नांदेड जिल्ह्यातला देगलूर तालुका. इथं, श्रीदेवी पाटील या प्रशिक्षणार्थी पीएसआय म्हणून २०१३ मध्ये रुजू झाल्या. महिला सबलीकरण आणि बालमजुरी निर्मूलन यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पाटील यांनी आत्तापर्यंत ५१ बालकामगारांची सुटका करून त्यांना शाळेची वाट दाखवली आहे. देगलूर तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळांतल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी त्या तिथे अचानक भेट देतात. तिथे नीट जेवण आणि अन्य सुविधा आहेत की नाही याची तपासणी करतात.
मार्केटमध्ये फिरताना, सिव्हिल ड्रेसवरही त्या रोड रोमियोंचा समाचार घेतात. त्या देगलूरला हजर झाल्याबरोबरच एक प्रसंग घडला. आणि त्यांच्या कामाची चर्चा सुरु झाली. रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या दोनतीन सडकसख्याहरींना पाटील यांनी पकडून काठीचा प्रसाद देत पोलीस ठाण्यापर्यंत नेलं. यामुळे रोडसाईड रोमियोंना वचक बसला. महिन्यातून एकदा त्या महिलांना पोलीस ठाण्यात आमंत्रित करतात. आणि गप्पांमधून कायद्याचं पालन, रक्षण महिला कसं करू शकतात, हे समजून देतात.
शेजारच्या तेलंगणा राज्यातल्या मुलांशी इथल्या मुलींची लग्नं लावून देणं इथे चालतं. श्रीमंती, जमीनजुमला बघितलं जातं. मात्र मुलाची चौकशी केली जात नाही. मग महिनाभरात या मुली माहेरी परततात. संसार मोडतात आणि परित्यक्ता महिलांचे प्रश्न तयार होतात. पाटील यांनी गुन्हे दाखल न होऊ देता पती-पत्नी, सासर-माहेरची माणसं यांचं समुपदेशन करून अनेक संसार जुळवले आहेत. यासाठी त्यांनी जवळपास ८० कार्यक्रम घेतले.
आणीबाणीच्या प्रसंगात महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस खात्याने ‘प्रतिसाद’ नावाचं मोबाईल ऍप तयार केलं आहे. पाटील यांनी शाळा-कॉलेजं आणि महिला मंडळात कार्यक्रम घेऊन त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आज अनेक विद्यार्थिनी, महिला हे ऍप वापरतात. यातला नंबर फिरवला की संकटात सापडलेल्या महिलेच्या चार नातेवाईकांच्या मोबाईलवर मेसेज जातो. पोलिसांनाही लोकेशन कळतं आणि तत्काळ मदत मिळू शकते.
जनतेला पोलीस आपले मित्र वाटावेत यासाठी त्या विविध कार्यक्रमात भाग घेतात. पोलीस-नागरिक संबंध विश्वासाचे व्हावेत म्हणून सोशल पोलिसिंगचे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. सोशल पोलिसिंग फायद्याविषयी श्रीदेवी पाटील म्हणतात, “अनेकदा लोक बंदोबस्तात, गुन्ह्याच्या तपासात मदत करतात. त्यांना सामील करून घेतल्याने त्यांचा खाकीबद्दलचा विश्वास वाढतो आणि गुन्हेगारांना तातडीने गजाआड करता येतं”.
त्यांचं पोलीस खात्यात येणं, तळमळीने काम करणं याविषयी त्यांनी सांगितलं, “‘माझे वडील बळीराम पाटील मुख्याध्यापक होते. त्यांनी आम्हा भावंडात, मुलगा-मुलगी असा कधीच फरक केला नाही. बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळकर पोफळी हे माझं गाव. नवोदय विद्यालयात मी शिकले. आयएएस व्हायचं माझं ध्येय होतं. म्हणून बारावीनंतर मी पुण्याला आले. एलएलबी केलं. पीएसआय परीक्षा दिली आणि निवडली गेले.”
महिला पोलीस अधिकारी म्हणून त्या कुठल्याच सवलती घेत नाही. मृत देहाचा पंचनामा, खुनाचा तपास, पोलीस बंदोबस्त, गुन्हेगारांशी सामना अशी कामं त्या आव्हान म्हणून स्वीकारतात. या नोकरीत कामाची वेळ ठरलेली नसते. नेहमी अलर्ट राहावं लागतं. रोजच झोपायला बारा-एक वाजतो. तरीही या कामात समाधानी असल्याचं त्या सांगतात. श्रीदेवी पाटील

– सु.मा.कुळकर्णी.