समीकचा जन्म माझ्यासाठी खूपच सुखावह होता

समीकचा जन्म माझ्यासाठी खूपच सुखावह होता. आईपण जगण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मुलाच्या जन्मानंतर आधी वर्षभराची सुट्टी घेतली. मग ऑफिसला जाऊ लागले. आणि नंतर नवरा संदीप याच्याशी सल्लामसलत करून नोकरी सोडलीच. त्यानंतर माझं मुलासोबत एक नवं विश्व तयार होऊ लागलं.
मी माझ्या बाळाला गोष्टी सांगू लागले. मी वाचून दाखवलेल्या गोष्टी समीक तंतोतंत सांगू लागला. अगदी इंग्लिशही. माझा आत्मविश्वास वाढला. नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य ठरला होता. 
आता समीकला शाळेत घालायचं होतं. मी अभ्यास घेऊ लागले. तो अभ्यासात गती दाखवू लागला. आजूबाजूचे वाहवा करू लागले. बाळाची पहिली शिक्षिका आईच असते हे म्हणवून घेण्यात मला आंनद वाटू लागला. समीकने पहिलीत पहिला, दुसरीत पहिला, तिसरी-चौथीतदेखील पहिला नंबर काढला.

चौथीत स्कॉलरशिप परिक्षेची तयारी चालू झाली. मी त्याचा दहावीसारखा अभ्यास घेऊ लागले. मुलगाही चांगलीच तयारी करू लागला. परीक्षा झाली. आता आम्ही दोघं निकालाची वाट पाहू लागलो. तोही मला हिरीरीने सांगू लागला, “आई, माझ्या फार तर पाच-सहा चुका असू शकतील. त्याच्यावर नाही.” तो मेरिटमध्ये येणार, त्याचं खूप कौतुक होणार हा विश्वास मलाही होताच.
दुसऱ्या दिवशी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी मी कम्प्युटरवर बसले. समीकही शेजारी होताच. त्याचा नंबर चेक करू लागले. आता माझी आई छान बातमी देणार या आशेने तो पाहत होता. पण माझ्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत होते. मी पुन्हा-पुन्हा नंबरावरून निकाल पाहत होते. मलाही सांगताना जड जात होतं.. “बाळा, मार्क्स कमी आहेत.” हे ऐकताच तो मटकन खाली बसला. रडू लागला. मला कळेना की याला आता कसं समजवायचं. प्रसंग माझ्यासाठी नवीनच होता. समीक अगदी हताश होऊन रडताना मी प्रथमच पाहात होते. कशीबशी समजूत काढून मी त्याला शांत केले.
हा इतका हताश का झाला? मी कारण शोधू लागले. माझ्या लक्षात आलं की मी त्याला सगळ्या गोष्टी यशस्वी लोकांच्याच सांगत होते. अपयशाबद्दल मी त्याला कधी सांगितलंच नाही. माझी चूक माझ्या लक्षात आली. यश मिळालं नाही तर जीवनात काही अर्थ नाही, असंच त्याच्या मनावर मी नकळत बिंबवत होते. त्या प्रसंगानंतर मी आणि संदीपने ठरवलं की समीकला त्याच्या कलेने त्याचा अभ्यास करू द्यायचा. त्याने स्वतःच अभ्यास करावा, यासाठी त्याला वेळ दिला. हे करताना त्याला त्रास होत होता. तो अभ्यासात थोडा मागे पडला. पण स्वप्रयत्नामुळे त्याची हताशा गेली. आता समीक मोठा झाला आहे. स्वतःची कामं स्वतःच करतो. कधी अभ्यासात कमी पडला तर सांगतो, मी थोडा अभ्यास कमी केला.
यश आणि अपयश हे दोन्ही जीवनाचे भाग आहेत. यश साजरं करायचंच. आणि अपयशही पचवायचं, हे आता तो शिकला आहे. पालक म्हणून आम्ही त्याला ते शिकायला फक्त मदत केली.
 – लता परब