समुपदेशनातून समाजसेवा करणारे कमल बागडी
अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातले कमल बाडगी. बेभरवशाचा शेतीव्यवसाय वडिलांना करताना त्यांनी लहानपणापासून पाहीलं होतं. अगदी बालवयात बँकेची घरी आलेली जप्ती देखील अनुभवलेली. त्यामुळे शिक्षणासाठी नातेवाईकांकडे ससेहोलपट झालेली. वर्गमित्रांचा गोतावळा तयार होऊ शकला नाही. ‘जिथं शिकायला जायचं तिथं संवादमाध्यमातून आपली जागा, सोशल नेटवर्क निर्माण करावं लागणार’ हे बालमनावर बिंबलं. पुढे आयुष्यभर त्याची त्यांना मदत झाली.
अमरावती शहरातून कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर कामासाठी यवतमाळ शहरात आले. नातलगांसोबत सीड्स आणि फर्टीलाझर क्षेत्रात काम सुरू केलं. आज त्यांचा स्वतःचा सीड्स पेस्टीसाईड्स आणि फर्टिलायझरचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्याची आवड होतीच. उत्तम वाचनामुळे संवादावर प्रभुत्व होतं.
सुरूवातीच्या काळात आपल्या समाजातील १०वी- १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणेतर गोष्टी सांगत अभ्यासाला ते प्रवृत्त करायचे. आपण केलेल्या चुका विद्यार्थ्यांनी करू नये हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. त्यातून त्यांच्या असं लक्षात आलं की विदयार्थी हे घरातल्या वातावरणामुळे, घरातील समस्यांमुळे विचलित होतात त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, जीवनावर होतो. तेव्हा त्यांनी पालकांशी संवाद साधायला सुरुवात केली. कारण समाजातल्या ९० टक्के समस्या या चुकीच्या किंवा संवादाच्या अभावामुळे आहेत. आणि अशा समस्या योग्य तऱ्हेच्या संवादामुळे ते सुटूही शकतात असं त्यांचं मत आहे.
१९९६-१९९७ मध्ये समाजाच्या एका कार्यक्रमात ‘बुजूर्गोपर संस्कार हेतू मार्गदर्शन’ या विषयावर बोलायला त्यांना बोलावलं आणि त्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थी-पालक संवाद, घरातल्या जेष्ठ मंडळींचा लहान व्यक्तींशी संवाद व वागणूक याविषयावर राष्ट्रीय स्तरावर भाषण द्यायला आमंत्रणे येऊ लागली. अनेक पालक त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना अभ्यास आणि इतर बाबतीत योग्य मार्ग दाखवण्यासाठी घेऊन येऊ लागले.
२०१० मध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. १७ शॉक व ९ दिवस कोमात राहिल्यानंतर ते त्यातून वाचले. आपण समाजाच्या सदिच्छेने वाचलो, त्यामुळे समाजासाठी आता आपण काही केलं पाहिजे असा त्यांनी निश्चय केला. हृदयविकारानंतर अवघ्या सहा महिन्यातच काही कारणास्तव त्यांना भावांसोबत असलेल्या भागीदारीतून वेगळं व्हावं लागलं. या दुसऱ्या संकटावरही त्यांनी धैर्यानं मात केली. नाजूक प्रकृती आणि व्यवसायासाठी तुटपुंजं भांडवल यातून त्यांनी पुन्हा व्यवसाय उभारलाच पण समुपदेशनाचं कार्यही भक्कमपणे उभारलं.
कमलजी आता आपला व्यवसाय सांभाळून अधिक वेळ समुपदेशन करतात. आजवर त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेतून बाहेर आणलं आहे, कित्येक विद्यार्थी जे घरगुती कारणामुळे विचलित झाले होते त्यांना मार्ग दाखवला आहे, अनेक पालकांना मुलांशी कसं वागावं, बोलावं, त्यांना कसं सांभाळावं त्याबद्दल समुपदेशन करत पाल्याबाबतच्या चिंतेतून मार्ग दाखवला आहे, ‘जनरेशन गॅप’मुळे पालक आणि मुले यांच्यातील वाद, डिप्रेशन, चिंता, गैसमज समुपदेशाद्वारे दूर केले आहेत. कितीतरी वैवाहिक जोडप्यांमधील अडचणी, विसंवाद दूर करत समुपदेशनाद्वारे त्यांना विभक्त होण्यापासून थांबवलं आहे, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कार्य म्हणजे कित्येक लोकांना कौटुंबिक कारणातून आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आहे. अनेक परिवारांना डिप्रेशन मधून बाहेर आणलं आहे. कमलजींनी समुपदेशनाचा जणू वसा घेतला आहे. यासाठी ते एक पैसाही घेत नाहीत. आपण जे करतो आहे ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपण समाजासाठी काही केलं पाहिजे या भावनेतून ते हे काम गेली २० वर्ष अखंडपणे करत आहेत.
कमल बागडी ह्यांचं वेगळपण म्हणजे जीवघेण्या आजाराकडे त्यांनी समाजकार्याची संधी म्हणून बघितलं. त्यामुळे अनेकांसाठी ते प्रेरक ठरत आहेत.
कमल बागडी,
बागडी ट्रेडर्स, दत्ता चौक, भाजी मार्केट समोर, यवतमाळ
फोन नं – 94234 35197
– निखिल परोपटे, यवतमाळ

Leave a Reply