साडेसहा हजार एचआयव्हीबाधितांचा आधार बबिता चारण

 

परभणीतल्या एका खेड्यात राहणारी रूपा. तिच्या नवऱ्याला एड्स होता. पण अज्ञानामुळे त्याच्यावर उपचार झाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला. सासरच्यांनी तर तिला घराबाहेर काढलंच, माहेरीही तिची फरफटच झाली. रूपा आजारी पडू लागली. तिलाही एचआयव्हीची बाधा झाल्याचं समजताच वडिलांनी तिला घराबाहेर काढलं.
परभणीतल्या सरकारी दवाखान्यात असताना तिची बबिताताईंशी ओळख झाली. त्यांनी रूपाला धीर दिला. तिला उपचारासाठी मुंबईला जे जे रुग्णालयात पाठवलं. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवांना मिळणारं पेन्शन तिला मिळवून दिलं. दुसरीकडे तिच्या वडिलांना मार्गदर्शन सुरू केलं. बबिताताईंच्या मार्गदर्शनाखाली रूपाची तब्येत सुधारू लागली. आता धुणीभांडी करून ती आणि वडील आनंदात राहत आहेत.
एचआयव्हीसह जगणाऱ्या बबिताताईंनी आतापर्यंत साडेसहा हजार गरजूंना प्रत्यक्ष मदत केली आहे. नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पिपल लिव्हिंग विथ एचआयव्हीच्या अध्यक्ष बबिताताई सांगतात,” २००४ चा काळ फार भयानक होता. एचआयव्ही बाधिताला तेव्हा वाळीतच टाकलं जायचं. अनेकांनी आत्महत्या केल्या. अशा गरजू सात जणांसाठी आम्ही २००५ पासून काम करायला सुरुवात केली.” जांब नाका इथल्या व्यायामशाळेजवळ त्यांची नेटवर्क ऑफ परभणी बाय पिपल लिव्हीग विथ एच.आय.व्ही/ एड्स ही संस्था आहे.
समाजात अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, एचआयव्ही,एड्स याबाबत अज्ञान आहे.विशेषतः मुलींमध्ये. याबाबत आजही तितकेसे उघडपणे बोलले जात नाही.जनजागृतीसोबत अनेक गोष्टींची आवश्यकता बबिताताई व्यक्त करतात. तेव्हा औषध घेण्यासाठी मुंबईला जावं लागे. मग जिल्हा रुग्णालयात सोय झाली तरी तिथं येणंही बाधितांना कठीण व्हायचं. प्रवासभाडेच नसल्यानं रुग्णांच्या उपचारात खंड पडून जीवही गमवावा लागे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (मुंबई) आणि संलग्न संस्थांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे प्रस्ताव दिला. प्रस्तावाला मंजुरी देत प्रत्येक एचआयव्ही’ संसर्गित रुग्णाला महिन्यातून केवळ दोन दिवस पन्नास किलोमीटर अंतरासाठी विनामूल्य बससेवा देण्याचा निर्णय झाला. नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पिपल लिव्हिंग विथ एचआयव्ही एड्स परभणी संस्थेतर्फे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. राज्यात दोन लाख 81 हजार ‘एचआयव्ही’ संसर्गित रुग्ण आहेत. त्यांना ही सेवा मिळावी, असा निर्णय झाला आहे. मात्र अनेक ‘एचआयव्ही’ग्रस्त ‘एसटी’च्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यांनाही सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न सुरूअसल्याचं बबिताताई सांगतात.
”आजची परिस्थिती बरीच बदलली आहे. २००८ मध्ये परभणीत एआरटी सेंटर सुरू झालं. आता बाधिताला ताबडतोब उपचार मिळतात. एचआयव्ही संसर्ग असलेली व्यक्तीही आनंदात जीवन जगू शकते.” बबिताताई आश्वस्त करतात

-बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply