सातपुड्यातला निसर्ग वाचणारा रामसिंग

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या रांगांमधल्या कोवली गावचे रामसिंग दुधल्या वळवी. त्यांनी सातपुड्याच्या डोंगररांगांमधल्या निसर्गाचं वाचन आणि अभ्यास करून त्याला नकाशाबद्ध केलं आहे. २२० प्रकारच्या वस्तू , धान्य आणि वनस्पतींचं संग्रहालय त्यांच्याकडे आहे. 


वनउपज संरक्षित करून त्याचं उत्पादन वाढवणं आणि त्यावर प्रक्रिया करून जागतिक बाजारपेठेत तिला ओळख मिळवून देण्याचं काम रामसिंग निष्ठेने करत आहेत.
आपल्याकडचं बीज, धान्य, फळंफुलं , वन्यजीव यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचबरोबर आदिवासी आत्मनिर्भर झाला पाहिजे, हा रामसिंग यांचा विचार. 1998 पासून नर्मदाकाठच्या कंजाला, सांबर, वेलखेडी, पलसखोबरा, डेबरामाळ, मांडवा परिसरात जैवविविधता संर्वधनाचं काम त्यांनी सुरू केलं. सुरुवातीला अडचणी आल्याच. पण नंदूरबारचं कृषी विज्ञान केंद्र आणि शासनाच्या विविध योजना यांची मदत घेत त्यांनी ३६ हजार झाडांचं सर्वेक्षण केलं. झाड, झुडपं, फुलझाडं , वेली, फळझाडं , कंदमुळं यांची वर्गवारी केली. नद्यांमधल्या माशांची सूची केली. 


सर्वेक्षणात ६२ प्रकारची झाडं, खाण्यायोग्य २८ प्रकारची फळं १३ प्रकारची कंदमुळं आढळली. ३५ प्रकारचे पक्षी तर १५ प्रकारचे प्राणी आढळले. 
स्थानिक ज्ञानसंपदा एकत्रित आणि नोंदणीकृत असावी यासाठी रामसिंग यांनी २००९ पासून युद्धपातळीवर काम सुरू केलं. स्थानिक वाण, बी – बीजवाई, धान्य उत्पादनं यांची माहिती संकलित केली. ५५ पेक्षा अधिक भाज्यांचा अभ्यास केला. आदिवासींनी पुरातन काळापासून ५२ बियाणांचे जतन केलं आहे. लोकसहभागासाठी परिसरात हंगामानुसार होणाऱ्या तीन आदिवासी प्रदर्शनांचा आधार घेतला. वनउपज आणि आदिवासींनी उत्पादित केलेल्या उत्पादनावर प्रक्रियाउद्योग रामसिंग यांनी उभारला आहे.
आता या कामाचा आवाका ९ गावांवरून २५ गावांपर्यंत विस्तारत आहे. रामसिंग यांनी २१ बचतगट तयार करून १७५महिलांचं सक्षमीकरण केलं. कृषिमंडळं तयार करून ७०० आदिवासी शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि समृद्ध करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे.

– कावेरी परदेशी