सातपुड्यात पुन्हा सुरू झालाय क्रीडासराव

 

लॉकडाऊनमध्ये समाजहिताचे अनेक नवे प्रयोग, प्रयत्न समोर आले. असाच एक उमेद देणारा प्रयत्न सुरू आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये. धनाजी बुद्रुक, तलावडी या गावात तीन अवलिया तब्बल ७० विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देत आहेत.


धडगाव तालुक्यात राहणाऱ्या ऍड छोटू वळवी यांना ही कल्पना सुचली. त्यांनी ती मनोहर पाडवी आणि विलास वळवी या मित्रांसमोर मांडली. यातले विलास धुळ्यात क्रीडाप्रशिक्षक. त्यांनी परिसरातील गाव – पाड्यांवरील मुलांना एकत्र आणले. शाळांना – महाविद्यालयांना सुट्टी असल्यानं मुलं घरीच होती. त्यांचा खेळांचा सरावही थांबला होता. धनाजी बुद्रुक इथं या तिघा मित्रांनी ७० मुलांना एकत्र आणले. यात आपापल्या शाळा-महाविद्यालयात विविध क्रीडाप्रकारांमध्ये निपुण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक खेळाडू आहेत. दुपारी दोन तास पाठ्यपुस्तकातलं शिक्षणही दिलं जातं. नंतर खेळाचा सराव. हा सराव शास्त्रशुद्ध आणि खडतर. कुठलाही मुलाहिजा न बाळगता मुलांकडून तयारी करून घेतली जात आहे. यात मुलगा – मुलगी असा भेद नाही.
१५ जूनपासून सुरू असलेलं हे प्रशिक्षण स्वयंप्रेरणा आणि समाजहितासाठी सुरू आहे.
या मुलांमध्ये कोणाला पोलीस व्हायचे आहे तर कोणाला जागतिक दर्जाचा धावपटू. साधनसुविधांचा अभाव आहे पण मुलांचा जोश तुसभरही कमी नाही. लॉकडाऊनमधेही प्रशिक्षण मिळत आहे याचं या मुलांना समाधान आहे.

– कावेरी परदेशी, ता. धडगाव, जि. नंदुरबार

Leave a Reply