साथीचा मुकाबला साथसाथ!

 

”योग्य काळजी घेतली, सोशल डिस्टंसिंग पाळलं तर कोरोनाला रोखणं अवघड नाही.” डॉ चैतन्य पाटील सांगतात.
डॉ चैतन्य केईम हॉस्पिटलमध्ये प्लॅस्टिक सर्जन. सध्या ते कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार करत आहेत. डॉ चैतन्य सर्जिकल बॅकग्राऊंडचे. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थापन आणि जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी करावी लागली. ”वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे असलो तरी सुरुवातीला या नवीन आजाराबद्दल थोडी भीती होतीच. त्याला कसं सामोरं जायचं कळत नव्हतं.” चैतन्य सांगत होते. ”मुख्य कुटुंबाला याची लागण होईल का, ही भीती होती. मला कोविड १९ च्या रुग्णांसोबत काम करायचं आहे हे घरी कळलं तेव्हा साहजिकच त्यांना काळजी वाटली. पण कुटुंबानं पाठिंबा दिला. मग हॉस्पिटलमधल्या हॉस्टेलवरच राहायला आलो. इथे सगळेच डॉक्टर्स, स्टाफ कोविडविरुद्ध लढणारे. एकाच परिस्थितीतून जाणारे. सगळे एकमेकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारे. गप्पांमधून ताण हलका होतो , धीर मिळतो , मनोबल उंचावतं. एक नवं कुटुंबच इथे मिळालं आहे.”


त्यांना मिळालेले पीपीई किट्स उत्तम दर्जाचे असल्याचं चैतन्य नमूद करतात. पीपीई किट घालून काम करणं खूपच अवघड. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात. घाम आणि डिहायड्रेशनचा शरीरावर परिणाम होतोच. मानसिक ताणही जाणवतो. सहा तासांचं काम २४ तासांच्या कामापेक्षाही जास्त वाटू लागतं.
”वॉर्डमध्ये दररोज ६० ते ७० रुग्ण येणं, रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास क्लेशकारी होतं. त्यांना धीर देणं आव्हानात्मक. किटमुळे संवाद साधणं जिकिरीचं.”
कामावर जाण्याच्या आधी आणि नंतर व्हिडीओ कॉल करून ते त्यांच्या कुटूंबाशी संवाद साधतात. कामात व्यत्यय यायला नको म्हणून घरच्यांनी त्यांना या दिवसात घरातील अडचणी सांगितल्या नाहीत.
”भीती आता आम्ही मागे सारली आहे. योग्य काळजी आम्ही घेतोय. एकमेकांच्या साथीतून आम्ही नवी ऊर्जा मिळवत आहोत.” डॉ चैतन्य म्हणाले.
– विजय भोईर

Leave a Reply